- वसंत भोसलेकेरळ आज ज्या परिस्थितीतून जातो आहे, ती आपल्याकडे उद्भवण्याची शक्यता कमी असली, तरी अशक्य निश्चितच नाही. पर्यावरणात किंवा वातावरणात थोडा जरी बदल झाला, तरी त्याचा मोठा फटका पश्चिम महाराष्ट्राला बसू शकतो.कोल्हापूरचे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व अमोल कोरगावकर पूरग्रस्त केरळवासीयांना मदत करण्यासाठी मोठ्या संघासह धावून गेले आहेत. मदतीला हाक द्या, मी हजर आहे, असे घोषवाक्य ते नेहमीच ऐकवीत असतात. त्याप्रमाणे कोल्हापूरची व्हाईट आर्मी आणि अॅस्टर आधार हॉस्पिटलच्या संघासह ते प्रचंड पावसाने हाहाकारात उद्ध्वस्त झालेल्या केरळमधील गोरगरिबांना मदत करीत आहेत. त्यांचे निरोप, अनुभव आणि छायाचित्रे पाठवीत आहेत. ती सर्व परिस्थिती पाहता आपण फारच सुखी आहोत, असे वाटत राहते. कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र आणि बेळगावसह उत्तर कर्नाटक हा भाग नेहमीच नैसर्गिक आपत्तीपासून चार कोस दूर आहे. एखादा अपवाद सोडला तर हा विभाग सुखी आणि सुरक्षित जीवनाचा स्वर्गच आहे.
भारताच्या पूर्व समुद्र किनाऱ्याला बंगालच्या उपसागरातून निर्माण होणाºया कमी दाबाच्या पट्ट्यातील वादळाचा धोका दरवर्षी कमी-अधिक प्रमाणात जाणवतो. त्याचा फटका पश्चिम बंगाल, ओडिसा, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूला बसतो. प्रचंड वेगाने वाहणाºया वाºयासह कोसळणारा पाऊस गोरगरिबांच्या झोपड्या पाडतो किंवा त्यांच्या झोपडीत जाऊन नासधूस करतो. केरळसह पश्चिम किनारपट्टीला देखील अशा प्रकारच्या कमी दाबाच्या पट्ट्याचा धोका असतो; पण वादळ कमी आणि पाऊस अधिक कोसळून नुकसान होते. अतिपूर्व भारतात ब्रह्मपुत्रा नदीच्या खोºयातील राज्यांमध्ये महापुराचा तडाखा बसतो. मैलोनमैल या नदीचे पाणी पसरते. बिहार आणि उत्तर प्रदेशातही असे घडते. बिहारची कोसी नदी तर महापुरासाठी कुप्रसिद्धच आहे. शिवाय गंगा नदी बिहारच्या मध्यवर्ती भागातून पुढे जाते. ती जणू त्या भागाला आपल्या कवेत घेत असते. गंगेला पूर आला की, नदीपात्रापासून चाळीस-पन्नास किलोमीटरपर्यंत पाणी पसरते. शेती, रस्ते, घरे सर्व काही पाण्याखाली जाते. हे पाणी महिनाभर राहते. त्यातून प्रचंड रोगराईचा धोका उद्भवतो.
नवी दिल्ली, पंजाब, हरयाणा, राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश, आदी भागांत प्रचंड उष्णता आणि प्रचंड थंडीचा दरवर्षी तडाखा असतो. काश्मीर, उत्तरांचल, हिमाचल प्रदेश, आदी राज्यांना अतिवृष्टीने दरडी कोसळून तडाखा बसतो. काश्मीर खोºयात प्रचंड थंडीचा तडाखा आणि हिमवृष्टीचा जोर वाढताच संपूर्ण जनजीवन उद्ध्वस्त होते. ईशान्येकडील राज्येही यातून सुटलेली नाहीत. शिवाय सीमावर्ती राज्यांना परकीय आक्रमणाचा धोका नेहमीच राहतो. अतिरेक्यांच्या कारवाया होत असतात. राजस्थान, गुजरात, पंजाब, जम्मू-काश्मीर या राज्यांच्या सीमांना नेहमीच सतर्क राहावे लागते. तसेच बांगलादेशाच्या सीमेवरही वातावरण आहे.
या सर्व तुलनेत पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक फारच शांत, निवांत, निसर्गाच्या कोणत्याही स्वरूपाच्या प्रकोपापासून दूर आहे. केरळच्या पार्श्वभूमीवर देशाचा संपूर्ण नकाशा डोळ्यासमोर तरळून जातो, तेव्हा आपण फारच सुखी आणि सुरक्षित आहोत, असे वाटू लागते. प्रचंड पाऊस नाही, कडाक्याची थंडी नाही की, भाजून काढणारा उन्हाळा नाही. काही वेळा अतिवृष्टी झालीच तर नद्यांना पूर येतो. त्याचे क्वचितच महापुरात रूपांतर होते. कोयना किंवा लातूरसारखा भूकंप शतकात एखादा विनाशकारी ठरतो. वीस-पंचवीस वर्षांत अतिवृष्टीने कृष्णा खोºयातील सर्वच नद्यांना महापूर आल्यास थोडा हाहाकार होतो. मात्र, जे केरळ आज अनुभवतो आहे, हिमवृष्टीने काश्मीर गोठून जातो, राजस्थानचे वाळवंट तापून माणसं करपून निघतात, गंगा किंवा ब्रह्मपुत्रेच्या महापुराने दैना उडते, तसे क्वचितच आपल्या वाट्याला येते. त्या सर्व पार्श्वभूमीवर आपण सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत सुरक्षित आहोत; मात्र आपण केरळपासून दूर नाही आहोत, अशी आपली वाटचाल चालू आहे. निसर्गाच्या सुरक्षिततेचा आपण सर्व गैरअर्थ काढतो आहोत का? गैर वागतो का? गैरवापर करतो आहोत का? अशी विचारणा स्वत:ला केली पाहिजे.
अलीकडच्या पिढीला स्मरणात असणारे तीनच महापूर कृष्णा खोºयात होऊन गेले. त्यापैकी १९५३ आणि २००५ चा महाभयंकर होता. १९८३ चा पूर अचानक आला आणि तातडीने ओसरूनही गेला. १९५३ चा महापूर पाहणारी पिढी आता राहिली नाही. त्या पुराने अनेक गावेच्या गावे पाण्याखाली गेली होती. अनेक वाहून गेली होती. विशेषत: वारणा आणि पंचगंगा नद्यांनी कहर केला होता. त्याचवेळी कोल्हापूर जिल्ह्यातील नवे पारगाव किंवा सध्याचे सांगली जिल्ह्यातील कोरेगाव, आदी गावांचे पूर्णत: पुनर्वसन करण्यात आले. ही गावेच नदीकाठावरून उठवून नव्याने वसविण्यात आली. तसा प्रयोग अनेक गावांबाबत करायला हरकत नव्हती. मात्र, काही तातडीने निर्णय घेण्यात आले. अतिधोकादायक गावांचे पुनर्वसन करण्यात आले. १९८३ चा महापूर अचानक अतिवृष्टी झाल्याने जूनच्या अखेरीस आला होता.
चार दिवसांपूर्वी नद्या कोरड्या होत्या. पाचव्या दिवशी पाणी पात्राबाहेर पडले होते आणि सहाव्या दिवशी पुणे-बंगलोर महामार्गावर कºहाड ते बेळगावपर्यंत पंचगंगा, वारणा, दूधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी, घटप्रभा, मलप्रभा, आदी नद्यांनी अतिक्रमण केले होते. कोल्हापूरच्या सांगली फाट्याजवळ पंचगंगेच्या जोरदार प्रवाहाने महामार्गच उखडला गेला होता. तसेच कागलजवळ दूधगंगेने आणि निपाणीजवळ यमगर्णी गावालगत वेदगंगेने महामार्गच खोदून काढला होता. अनेक गावांमध्ये पाणी शिरले होते. रानात उभी पिके नव्हती. कारण पावसाची सुरुवात होऊन अद्याप पेरण्याच व्हायच्या होत्या. नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात तसेच पाणलोट क्षेत्राच्या बाहेरही चार दिवसांत अतिप्रचंड पाऊस झाला होता. त्याकाळी वारणा, दूधगंगा, वेदगंगा, आदी नद्यांवर अद्याप धरणे झाली नव्हती. पाणी अडलेच नाही. सर्व काही पात्रांतून रानात आणि रानातून रस्त्यांवर आले होते.
अलमट्टी धरणाच्या नावाने खडे फोडत गाजलेला २००५ चा महापूर सर्वांनाच आठवतो. त्या पुराने नवीनच विक्रम प्रस्थापित केले आणि कर्नाटकात अलमट्टी येथे त्याच वर्षी पूर्ण झालेल्या धरणात पाणी साठविले गेले. त्याचे नियोजन झाले नाही. परिणामी त्याच्या फुगवट्याने कृष्णा खोºयातील सर्व नद्यांना महापूर आला, असा शोध लावण्यात आला. वास्तविक ते खरे नव्हते. कृष्णा खोºयातील जवळपास चोवीस नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात प्रचंड पाऊस सलग तीन आठवडे होत होता. आदल्यावर्षी पाऊस कमी झाल्याने पाणीटंचाई निर्माण झाली होती. सर्व पाणी अडवून धरणे भरून घेतली आणि जेव्हा पाणलोट क्षेत्रात तसेच त्याच्या बाहेरही आठवडाभर अतिवृष्टी झाली, तेव्हा नियोजन कोलमडले. पाणलोट क्षेत्राबाहेरील पावसाच्या पाण्याने पूर आलेच होते, शिवाय पाणलोट क्षेत्रातील अतिवृष्टीने धरणांमधील पाणीसाठा आवाक्याबाहेर गेला होता. सर्व धरणांतून पाणी सोडावे लागले. कारण जुलैअखेरपर्यंत केवळ पन्नास टक्केच पावसाळा संपला होता. पुढे अजूनही पावसाचे खूप दिवस होते. हा धोका ओळखून सर्व धरणांचे दरवाजे उघडण्यात आले. कोयनेतून लाखाहून अधिक क्युसेकने पाणी सोडून देण्यात आले. या सर्वांचा परिणाम कृष्णा, वारणा, पंचगंगा, आदी सर्वच नद्यांना न भूतो (न भविष्यती) असा महापूर आला होता.
अलीकडील काळातील या तीन महापुरांव्यतिरिक्त १९६७ मध्ये १० डिसेंबर रोजी कोयनेचा मोठा भूकंप झाला होता. त्यानंतर ३० सप्टेंबर १९९३ रोजीच्या पहाटे लातूरचा महाभयंकर भूकंप झाला होता. कोयनेचा फटका पश्चिम महाराष्ट्र आणि सीमावर्ती भागाला बसला होता. लातूरचा भूकंप प्रामुख्याने मराठवाड्याला बसला होता. याशिवाय १९७२ चा मोठा दुष्काळ जीवन उद्ध्वस्त करून गेला होता. त्याने मोठ्या प्रमाणात लोकांचे स्थलांतर घडले होते. उत्तर कर्नाटकातील हजारो लोक महाराष्ट्रात आश्रयाला आले होते. त्यापैकी बहुतांशजण येथेच कायमपणे स्थायिक झाले.
केरळ आज ज्या परिस्थितीतून जातो आहे, ती आपल्याकडे उद्भवण्याची शक्यता कमी असली, तरी अशक्य निश्चितच नाही. पर्यावरणात किंवा वातावरणात थोडा जरी बदल झाला, तरी त्याचा मोठा फटका पश्चिम महाराष्ट्राला बसू शकतो. २००५ चा महापूर ही त्याची रंगीत तालीम आहे. केरळमधील अनेक नद्यांना अडवून पर्यावरणाचा ऱ्हास करून ‘विकास’ साधण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यातूनच हा पाऊस सामावून घेता आला नाही. कमी वेळेत अधिक पाऊस होणे, हे नैसर्गिक आहे. ते अकृत्रिम नाही. ती आपत्ती ठरू शकते; पण मानवाचे दृश्य स्वरूपात झालेले नुकसान अधिक जाणवते आहे. कारण आपण नद्या, नाले अडवून पर्यावरणाचे निसर्गचक्र रोखून धरण्यात आघाडीवर आहोत. १९५३ किंवा १९८३ च्या महापुराने कृष्णा खोºयातील गावांना, शेतीला आणि सार्वजनिक मालमत्तेला कमी हानी पोहोचली त्यापेक्षा कितीतरी अधिक हानी २००५ च्या महापुराने झाली. कारण आपण नद्या अडवू लागलो आहोत, नद्याच नष्ट करू पाहत आहोत. वाळू उपसून त्यांच्या निसर्गदत्त वाहण्याची शक्ती केव्हाच संपुष्टात आणली आहे.
कोल्हापूर, सांगली, कऱ्हाड, वाई, कुरुंदवाड, मिरज, इचलकरंजी, आदी मोठ्या शहरांबरोबरच असंख्य गावांनीही या नद्यांचे प्रवाह रोखणारे पराक्रम केले आहेत. ज्याला रेडझोन म्हणतो अशा नद्यांच्या पाण्याखाली जाणाऱ्या जागा व्यापून टाकल्या आहेत. पंचगंगेवरून जाणाºया महापुराच्या आजूबाजूला पहा. सांगलीत कृष्णेच्या पश्चिमेला सांगलीवाडीला पहा. या नद्यांच्या काठाजवळच भर टाकून गृहबांधणी प्रकल्प किंवा दुकानदारी टाकत आहोत. आपण केरळपासून दूर नाही आहोत, हे दाखविण्याचा तर हा अट्टाहास नाही ना? अनेक ठिकाणी पूल उभारले आहेत. दोन्ही बाजूला त्याला जोडणारे अप्रोच रस्ते तयार केलेत; पण पाणी वाहून जाण्यासाठीची मोकळीकता ठेवली नाही. पाणी अडून राहील याचीच काळजी घेतली आहे. यावर वारंवार लिहिण्यात आले. ना राज्यकर्त्यांना, ना प्रशासनाला याची जाणीव होते. २००५ सारखा महापूर आला तरच त्यांना या चुका दिसणार, तोवर वेळ निघून गेलेली असणार!