- नंदकिशोर पाटील, कार्यकारी संपादक, लोकमत
समीर गायकवाड, पूजा चव्हाण, रफी शेख, सिया कक्कर ही नावे अनेकांच्या चांगल्याच परिचयाची आहेत. विशेषत: जे सोशल मीडिया नावाच्या आभासी दुनियेत वावरत असतात, त्यांच्यापैकी अनेकांसाठी तर ही मंडळी ‘आयकाॅन’ असू शकतील. वर उल्लेख केलेल्या नावांच्या व्यक्ती नाव, गाव, स्थलपरत्वे भिन्न असतील; पण त्यांच्यात एक साधर्म्य आहे, ते म्हणजे, हे सगळे जण टिक-टाॅक, इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावरचे स्टार आहेत आणि या सर्वांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा अकाली संपविली आहे. नाचगाणे, अथवा काॅमेडीचा एखादा व्हिडिओ पोस्ट करून ही मंडळी रातोरात स्टार बनली होती. पुढे तो त्यांचा दिनक्रम बनला आणि त्यातून त्यांना लाखो चाहतेही (फाॅलोअर्स) मिळाले. लाइक्स, शेअर अन् कमेंटची अक्षरश: झिंग चढलेले आभासी दुनियेतील हे तथाकथित स्टार आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलतात, हा चिंतनाचा आणि सामाजिक चिंतेचा विषय आहे. एखाद्याच्या आत्महत्येमागे कौटुंबिक, आर्थिक वा इतर काही वैयक्तिक कारणे असू शकतात, पण सोशल मीडियाने रातोरात दिलेली प्रसिद्धी आणि ती टिकवून ठेवण्यासाठी खेळावा लागणारा “लाइक्स”च्या आकड्यांचा खेळ हा एक नवाच जीवघेणा फास तयार झाला आहे. मिळालेली प्रसिद्धी हाताळू न शकलेले अनेक तरुण चेहेरे अचानक गायब तरी होतात, विस्म्रृतीत जातात. ज्यांना हे असे विसरले जाणे, विसरले जाण्याची शक्यताही सहन करता येत नाही, ते स्वत:लाच संपविण्याचा मार्ग पत्करतात असे दिसते.
सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असणाऱ्या तरुणांच्या आत्महत्येचे प्रमाण जगभर वाढू लागले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अलीकडच्या आकडेवारीनुसार जगभरात दर ४० सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करते आणि त्यात तरुणांचे प्रमाण ६० टक्के इतके आहे. मानसिक तणाव हे आत्महत्यांमागचे प्रमुख कारण आहे. व्हर्च्युअल जगात वावरणाऱ्यांना सतत भावनिक चढ-उताराचा सामना करावा लागतो. इथल्या स्पर्धेत आपण अव्वल राहू की नाही, या भीतीपोटी ते अधिकाधिक वेळ ऑनलाइन असतात. लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर हे रातोरात स्टार बनलेले नाहीत. त्यांच्या स्टारडममागे अपार मेहनत आहे. त्यांच्याही आयुष्यात मान-अपमानाचे प्रसंग आले, त्यांनाही यशाने अनेकदा हुलकावणी दिली; पण म्हणून ते खचले नाहीत. स्टारडमसुद्धा तितक्याच निगुतीने जपावे लागते. त्यासाठी प्रयत्नांचे सातत्य लागते. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या मुलांना हे कोणीतरी सांगण्याची गरज आहे. वयात आलेल्या मुलांच्या वर्तनात अचानक झालेला बदल हा सोशल मीडियाचा परिणाम असू शकतो आणि तो वेळीच हेरता आला नाही, तर पुढे आक्रित घडू शकते.