- सचिन जवळकोटे
वय झालं म्हणून सिंह कधी गवत खात नाही, हे गेल्या दहा दिवसांत ‘थोरले काका बारामतीकरां’नी दाखवून दिलेलं. फेकलेल्या तुकड्यांना लाथाडून स्वत: शिकार करायला वाघ कधी मागं-पुढं बघत नाही, हेही निकालानंतर ‘मातोश्री’वरच्या आक्रमक डरकाळीनं कळून चुकलेलं. आता विषय इतकाच, गेल्या पाच वर्षांत रक्ताळलेल्या खंजिरांचं काय होणार ? ‘सत्तेसाठी पक्षांतर केलं...परंतु पुन्हा सत्तेविना जिणं आलं !’ असं म्हणणा-यांचं सांत्वन कोण करणार ?
‘लाल बत्ती’ गेली.. वर्दळ गेली..
हाती केवळ आमदारकी राहिली !
सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणासाठी सध्याचा काळ अत्यंत ‘टर्निंग पॉर्इंट’चा. गेल्या पाच वर्षांत ज्यांनी अख्ख्या जिल्ह्याची सूत्रं स्वत:च्या ताब्यात घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला, ते दोन्ही ‘देशमुख’ आजच्या घडीला ‘माजी मंत्री’ बनले. ‘लाल बत्ती’ गेली, वर्दळ गेली, हाती केवळ आमदारकी राहिली. ज्या ‘बाणा’च्या उमेदवारांना संपविण्यासाठी यांनी आतून गेमागेमी केली, तेच आता नाकावर टिच्चून सत्तेवर येऊ लागलेले. ‘सावंतांची तानाशाही’ सहन करण्यासाठी ‘कमळ’वालेही मानसिक तयारी करू लागलेले.तरी बरं...सोलापुरात ‘बाणा’च्या ‘आजी-माजी’ जिल्हाप्रमुखांशी या दोन्ही ‘देशमुखां’ची आतून चांगलीच सलगी. याचा सज्जड पुरावाच निकालादिवशी तमाम सोलापूरकरांना मिळालेला. कुमठ्याच्या ‘मानें’ना ज्यांनी बळं-बळंच ‘मध्य’मध्ये उभं केलं, ते ‘पुरुषोत्तम’ निकाल लागल्यानंतर ‘उत्तर’चा ‘विजयो’त्सव साजरा करण्यात रंगलेले. ‘दिलीपरावां’ना इतक्या-इतक्या मतांनी लीड देऊ, अशी राणाभीमदेवी घोषणा करणारे ‘गणेश देगावकर’ही याच निकालादिनी ‘बापूं’सोबत ‘दक्षिण’चा गुलाल अंगावर घेण्यात रमलेले. ‘बाण’वाल्या या दोन्ही पदाधिका-यांच्या चेहऱ्यावर ना ‘मध्य’च्या पराभवाचं सुतक दिसलं ना चौथ्या क्रमांकावर फेकलं गेल्याचं दु:ख जाणवलं. म्हणतात ना...यशाचे धनी लाख असतात, अपयश मात्र बेवारशी असतं.असो. ‘माने-कोठे’ जोडीला आपापसात झुंजायला लावून या साºयांनीच आपापली गेम छानपैकी वाजवून घेतली. ‘बरडे-ठोंगे’ नेहमीप्रमाणं ‘जिल्हाप्रमुख’ पदासाठी भांडायला मोकळे झाले. शत्रूचं खच्चीकरण झाल्यानं आता पाच वर्षे आपण निवांत, या भावनेतून दोन्ही ‘देशमुख’ही रिलॅक्स बनले; परंतु या गोंधळात ‘प्रणितीतार्इं’चा ‘हात’ मोठा झाला हे आलंच नाही यांच्या लक्षात. आता कदाचित नव्या सरकारमध्ये ‘लाल दिव्याची गाडी’ जेव्हा ‘जनवात्सल्य’समोर येऊन धडकेल, तेव्हा यांना फुटेल घाम. मात्र ‘बरडे-वानकर’सारखी ‘निष्ठावंत’ मंडळी रुमाल घेऊन सोबत असल्यानं या दोन्ही देशमुखांना म्हणे नसावी एवढी चिंता. परंतु ज्यांनी ‘बारामतीकरां’ना सोडून ‘कमळ’ हातात धरलं, त्यांचं काय ? ‘अपनी तो जैसे तैसे कट जायेगी...आपका क्या होगा जनाबे आलीऽऽ’ असं नक्कीच ‘प्युअर लोटस’वाले बाकीच्या ‘आयारामां’ना म्हणू लागतील. लगाव बत्ती...
एक ‘कुर्सी’.. दो ‘दाढी’ !
‘महाशिवआघाडी’ सत्तेवर आलीतर ‘सीएम’ची खुर्ची ‘बाणा’कडं जाणार हे जसं स्पष्ट झालंय, तसंच पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश ‘पालकमंत्री’ पदंही ‘बारामतीकर’ स्वत:च्याच पार्टीकडं घेणार हेही कळून चुकलंय...कारण ‘थोरले काका बारामतीकर’ यांचा हाच पट्टा जीव की प्राण. तशात कोल्हापूरच्या ‘म्हाडकां’पासून अकलूजच्या ‘पाटलां’पर्यंत अनेकजण पाठीत वार करण्यात रमलेले. आयुष्यभर ‘खंजीर’रूपी कहाण्यांचं वलय घेऊन फिरणारे ‘थोरले काका’ स्वत:च्याच पाठीतल्या या नव्या वेदनेपायी कासावीस झालेले. आता वेळ फिरलीय. वार करणारे सामोरे आलेत. ‘एकेकाला बघून घेतोऽऽ’ ही घेतलेली शपथ पूर्ण करण्याची वेळ आलीय. त्यामुळंच सोलापूरसाठी ते आपलाच ‘पालकमंत्री’ नेमण्याची शक्यता दिसू लागलीय. त्यातही नाव ‘भारतनाना’चंच पुढं.किती गंमत नां...एकीकडं ‘पालकमंत्री’पदाचे दावेदार असलेले ‘बाण’वाले आमदार ‘शहाजीबापू’ यांना दाढी. दुसरीकडे ‘भारतनाना’ यांनाही दाढी. फरक फक्त एवढाच की, ‘नानां’ची राजकीय कारकीर्द ‘धनुष्यबाणा’पासून सुरू झालेली...तर ‘बापूं’चा राजकीय प्रवास आता याच ‘बाणा’पर्यंत शेवटी येऊन पोहोचलेला. लगाव बत्ती...
रिक्षा म्हणाली नेत्याला.. खुर्ची नसेल
तर मीही चालते तुम्हाला !
पेशानं प्राध्यापक असलेल्या ‘वाघोली’च्या ‘लक्ष्मणरावां’नी एकेकाळी ‘सुता’वरून सत्तेचा स्वर्ग गाठलेला. ‘पोपटपंची’ म्हणून कुचेष्टा झाली, तरीही त्यांच्या वाणीतला कडवटपणा कमी झाला नाही. ‘सत्ता दरबारातला नाच्या’ म्हणून अवहेलना झाली, तरीही त्यांच्या पायातली भिंगरी कधी थांबली नाही. ज्यासाठी ‘घड्याळ्याचे काटे’ मोडून ते ‘कमळ’ हुंगू लागले, तीच सत्ता यंदा गमाविण्याची वेळ आली. तरीही त्यांचं बोलणं-चालणं थांबलंच नाही. चारच दिवसांपूर्वी त्यांनी ‘पवारांची स्ट्रेंथ’ मोजून ‘बारामती भक्तां’ना अंगावर ओढवून घेतलं.स्वत:हून वादळाला सामोरं जाणारे हे अवलिया प्राध्यापक महाशय जिल्ह्यातील ‘घड्याळ’वाल्यांना पुरून उरलेत, हे मात्र नक्की. लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘लक्ष्मणरावां’नी ‘अनगरकरां’वर राळ उडविलेली. तेव्हा दिल्या खुर्चीला जागणारे मोहोळचे ‘चवरे’ लगेच वाड्याच्या मदतीला धावले होते. त्यांनी ‘रेडीमेड पत्रका’तून ‘लक्ष्मणरावां’च्या कार्यपद्धतीवर ‘प्रकाश’ टाकताना ‘आता स्वत:चा संसार नीट करा,’ असा अनाहूत सल्लाही त्यावेळी दिला होता. तेव्हा सटकलेले ‘लक्ष्मणराव’ थेट ‘चवरें’च्या घराकडं निघाले होते. मोहोळमधील चौकात आपली आलिशान गाडी लावून चक्क खटारा ‘टमटम’मध्ये बसले होते. याच रिक्षातूून ते ‘चवरें’च्या घरी पोहोचले अन् ‘संसार कसा करायचा असतो’ याची झलकही दाखविली होती.
.. परंतु त्यांच्यासाठी हे सारं ‘आपलं सरकार’ असेपर्यंत ठीक होतं होऽऽ. सत्तेच्या जीवावर कितीही उड्या मारल्या तरी लोकांना कौतुक वाटतं; मात्र सत्ता नसताना केलेल्या कसरतीही जनतेला गंमती वाटू लागतात. त्यामुळं आता पाच वर्षे ‘लक्ष्मणरावां’सारख्या कैक मंडळींना खूप सावधपणे राजकारण करावं लागणार, हे मात्र नक्की. लगाव बत्ती...
जाता-जाता : ‘आपका क्या होगाऽऽ’ हे गाणं प्रातिनिधीक स्वरुपात ‘लक्ष्मणरावां’साठी असलं तरी ‘अकलूजचे दादा, पंढरपूरचे पंत, बार्शीचे राजाभौ अन् शेटफळचे डोंगरे’ यांनाही लागू होत असतं म्हणे ! बाकी अधून-मधून ‘अजितदादां’च्या संपर्कात असणाऱ्या ‘संजयमामां’च्या कानावर हे गाणं पडलं नाही तरी काही हरकत नसावी. लगाव बत्ती...
(लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)