- सचिन जवळकोटे(निवासी संपादक, लोकमत, सोलापूर)
भूतलावर काहीतरी धप्पऽऽकन् पडल्याचा जोरदार आवाज इंद्र दरबारापर्यंत पोहोचला. सारेच दचकले. अप्सरा म्हणाली, ‘अगंबाई, गेल्या शतकातील स्कायलॅब-बियलॅबसारखा कोणता उपग्रह आदळला की वाटतं...’ यावर उर्वशी उत्तरली, ‘शेतकऱ्यांचं आंदोलन सहजपणे चिरडू, या दिल्ली पोलिसांच्या दिवास्वप्नाचा फुगा फुटला ना, त्याचाच हा आवाज.’ नारद बोलले, ‘होय. फुगा फुटल्याचाच आवाज, परंतु हा फुगा गावोगावातील तरुणांच्या स्वप्नांचा. विशेष म्हणजे, तो फोडलाय खुद्द दादा बारामतीकरांनी,’ इंद्र महाराजांना हसू फुटलं, ‘गेल्या वर्षी उगाउगी फुगाफुगी करणारे दादा आता चक्क फुगे फोडायचे काम करू लागलेत वाटतं. काय केलं त्यांनी नेमकं?...’ तेव्हा मुनी म्हणाले, ‘राजकारण लऽऽय बेक्काऽऽर असं सांगत दादांनी राजकारणात उतरू हे ऐकून कुणीतरी हळूच पुटपुटलं, ‘मग यापुढे कोणत्याही निवडणुकीत पार्थ उतरणार नाही की काय? ’ - तेव्हा गालातल्या गालात हसत मुनी उत्तरले, ‘हा सल्ला पार्थसाठी नव्हता हो. बहुधा रोहितदादांसाठी असावा!’ मग काय... दादांचा सल्ला नेमका कुणाला, याचा विचार दरबारातील प्रत्येक जण करू लागला. ‘असे एक से एक सल्ले देणारे कोण-कोण आहेत या भूतलावर, त्याचा शोध घ्या,’ इंद्रदेवांनी आदेश काढला.नारद निघाले. सर्वप्रथम त्यांना जाकीटवाले नेते ‘आठवले’. दाढी खाजवत ते ‘ट्रम्प-बायडेन यांनी कसं वागायला हवं,’ याचा सल्ला देण्यात गुंग होते. गल्लीत आपले चार कार्यकर्ते निवडून आणण्याऐवजी विश्वाचीच चिंता करणाऱ्या या आधुनिक ‘राजकीय कविवर्यां’ना शुभेच्छा देत मुनी ‘अकोल्या’च्या ‘बाळासाहेबां’ना भेटले. ‘सरकार कसं चालवायला हवं?’ हा सल्ला देण्यात डॉक्टरही नेहमीप्रमाणे रमले होते. मुनींना आश्चर्य वाटलं... आजपर्यंत एकदाही सत्तेवर येऊ न शकलेले नेते जगाला कसं काय सत्ताकारणाचे सल्ले देऊ शकतात?आजकाल केवळ दुरूनच सल्ला देण्यापुरते ‘सुशीलकुमार’ तोंड उघडतात, अशी माहिती मिळताच मुनी थेट सोलापुरात पोहोचले. मात्र, तिथे उलटंच दिसलं. चक्क रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात ते रमले होते. ‘अकलूज’मधील ‘सिंहां’च्या कळपातून ‘धवल’ छाव्याला अलगद उचलून घेणारे ‘सुशीलकुमार’ आता बारामतीकरांनाही चॅलेंज देण्यास मागंपुढं पाहणार नाहीत, हे मुनींच्या लगेच लक्षात आलं. लातूरच्या ‘धीरज भैय्यां’सोबत घड्याळाचे काटे उलटे फिरविण्याचीही रणनीती आखली गेलीय, हेही मुनी समजून चुकले, तरीही तिथून निघताना ते थोडेसे मनातल्या मनात चुकचुकले, ‘पाच-सहा वर्षांपूर्वींच अशी आक्रमक भूमिका घेतली असती, तर आज कार्यकर्त्यांसोबत आंदोलन करण्याची वेळ आली नसती,’ असा विचार करत नारद मुनींनी पुणं गाठलं.तिथं काकडेंचे संजय महाराष्ट्राचा नकाशा घेऊन बसलेले. चंदूदादा कोथरूडकरांना गडहिंग्लजमधून निवडून आणायचं की गडचिरोलीतून, याचा अभ्यास सुरू होता. कधी ‘हात’वाल्यांसोबत सलगीच्या तर कधी ‘घड्याळ’वाल्यांच्या गोटात प्रवेशाच्या बातम्या पेरण्याएवढं सोप्पं वाटलं की काय ते, असं स्वतःलाच विचारत मुनी मग मुंबईकडे रवाना झाले.नव्या मुंबईतल्या रस्त्यावर भाजी विकत घेणारे रोहितदादा बारामतीकर मुनींना दिसले. ‘ब्रॅण्डिंग’वाली टीम होतीच दिमतीला. ‘काय दादाऽऽ आजकाल तुम्ही बारामतीत कमी अन् अख्ख्या महाराष्ट्रात जास्त दिसताय. तुमच्या मोठ्या दादांचा टीआरपी मोडीत काढण्याचा चंगच बांधलेला दिसतोय तुम्ही,’ मुनींनी गुगली टाकली. तसे रोहितदादा चमकले. हळूच कानात खुसखुसत त्यांनी ब्रेकिंग न्यूजही देऊन टाकली.. ‘भविष्यात सीएमच्या खुर्चीसाठी घरातच स्ट्राँग ऑप्शन तयार करायचा असेल, तर आत्तापासूनच अवघा महाराष्ट्र पालथा घालावा लागेल हा थोरल्या काकांचाच सल्ला आहे म्हटलं.’ मुनी मनातल्या मनात म्हणाले, ‘नारायणऽऽ नारायणऽऽ’... आणि मुकाट इंद्रलोकाकडे रवाना झाले.