मोबाइल हेच आता सर्वांच्या माहितीचे भंडार झाले आहे. जवळपास सर्वच वैयक्तिक माहिती मोबाइलमध्ये आपण सेव्ह केलेली असते. पण, गेल्या काही महिन्यांपासून मोबाइल हॅक होण्याचे, डाटा चोरल्या जाण्याचे प्रमाण वाढू लागले आहेत. तुम्हाला या हॅकर्सच्या हल्ल्यांचा शिकार व्हायचे नसेल तर आधीच काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी काही उपाय करावे लागतील.
कायम मोबाइलच्या ‘स्क्रिन लॉक’चा वापर करा. मोबाइल बँकिंगचा वापर करताना स्क्रिन अनलॉकचे ऑप्शन वापरा. त्यामुळे कोणासही बँकिंगच्या ॲपमध्ये फेरफार करता येणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणचे आपल्या बँक खात्यासंदर्भातील कोणतीही माहिती मोबाइल डिव्हाइसमध्ये स्टोअर करू नका. जसे खाते क्रमांक, डेबिट आणि क्रेडिट कार्ड पिन आपल्या फोनमध्ये स्टोअर करू नका याशिवाय मालवेअर अटॅकसाठी सर्वात घातक प्लॅटफॉर्म समाजमाध्यम आहे. समाजमाध्यमामध्ये बरेच यूजर अशी काही माहिती शेअर करतात त्यामुळे मालवेअर अटॅक होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशी माध्यमे वापरताना कायम सावध राहा.
तुमच्या कुटुंबीयांच्या नावाने किंवा सहज ओळखता येईल, अशा नावाचा पासवर्ड ठेवू नका. तसेच अक्षरांबरोबर आकड्यांचा वापर पासवर्डमध्ये करा. लॉग-इन करताना ‘रिमेम्बर पासवर्ड’ हे ऑप्शन वापरू नका. सार्वजनिक ठिकाणी किंवा कॉमन कॉम्प्युटरवरून तुमचे ई-मेल किंवा अन्य संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर ‘ब्राऊझिंग हिस्ट्री’ आणि कुकीज डिलीट करण्यास विसरू नका.