दहावीत कमी गुण मिळाले, अभियांत्रिकीला कुठेच नंबर नाही लागला, तर आयटीआयला प्रवेश घेण्याचे दिवस कधीच गेले. उलट अभियांत्रिकीचेच दिवस भरले, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
मराठवाड्यात ३० अभियांत्रिकी महाविद्यालये आणि ७५ तंत्रनिकेतन, अशा तंत्रशिक्षण देणाऱ्या १०५ संस्था आहेत. त्यातून दरवर्षी सहा हजार बी. ई. पदवीधारक, १६ हजार पदविकाधारक अभियंते तयार होत असतात. पुढे काय होते या अभियंत्यांचे? पाच हजारांपासून नोकरी करावी लागते त्यांना. मोठमोठ्या कंपन्यांची पसंती आता एनआयटी आणि आयआयटीच्या अभियंत्यांनाच आहे. त्यातूनही रिक्त राहिलेल्या जागा चक्क आयटीआयमधून भरल्या जात आहेत. त्याला कारणही तसेच आहे. हे अभियंते ‘सॉफ्ट स्कील’मध्ये कमी पडतात, असे उद्योगजगताचे मत आहे.
मराठवाड्यातील अनेक संस्थांमध्ये उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा, तज्ज्ञ प्राध्यापकांचा अभाव आहे. त्यामुळे या संस्थांमधून तयार होणारे अभियंते कसे असणार? मोठे उद्योग त्यांना कसे स्वीकारणार? शिक्षणावर वर्षाला साधारण एक लाख रुपये खर्च करून महिन्याला पाच-दहा हजार रुपयांची नोकरी मिळत असेल, तर काय होईल? मराठवाड्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांचे सध्या तेच होत आहे. शिवाय उद्योगांच्या मागणीपेक्षा दरवर्षी कॉलेजमधून बाहेर पडणा-या अभियंत्यांची संख्या कितीतरी जास्त आहे. त्यामुळे मिळेल त्या पगारावर काम करण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे. परिणामी मराठवाड्यात अभियांत्रिकीला जाणा-यांची संख्या रोडावते आहे. त्यामुळे अनेक शाखा बंद करण्याची परवानगी ही महाविद्यालये मागत आहेत. ही स्थिती झाली अभियांत्रिकी महाविद्यालयांची.
याउलट परिस्थिती आहे आयटीआयची. एकट्या औरंगाबादचे उदाहरण घेतले तर इथे विद्यार्थ्यांची वीजतंत्री अर्थात इलेक्ट्रिशियन या ट्रेडला सर्वाधिक पसंती आहे. केवळ २१ जागांसाठी यंदा तब्बल १२ हजार ३३१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यासोबत तारतंत्री, यांत्रिक डिझेल, यांत्रिक मोटारगाडी, जोडारी (वेल्डर), कातारीसह इतर ट्रेडला विद्यार्थ्यांची पसंती आहे. या ट्रेडनंतर एकतर तात्काळ नोकरी मिळते. समजा ती नाहीच मिळाली तर कोठेही स्वत:चे दुकान थाटता येते. शेवटी काहीच नाही तर केवळ संपर्काच्या भरवशावर काम करून चार पैसे मिळविता येऊ शकतात. एखादा अभियंता हे करू शकतो का? वेल्डिंगचे दुकान तो थाटू शकतो का? पंक्चरचे दुकान त्याच्या स्टेटस्ला चालते काय? अभियांत्रिकी आणि आयटीआयमधील हा बदल मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनी आता ओळखला आहे. त्यामुळेच आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत आहे.
मराठवाड्यात आयटीआयची ८२ शासकीय आणि ३६ खाजगी महाविद्यालये आहेत. यावर्षी प्रवेशासाठी १८ हजार १३९ जागा उपलब्ध आहेत. यासाठी तब्बल ५६ हजार १३९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या ट्रेडनंतर कोणीच बेकार राहत नाही, हे या विद्यार्थ्यांना चांगले ठाऊक आहे.