कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या गाजलेल्या आणि आजही गाजत असलेल्या कवितांमधील एक कविता म्हणजे, ‘प्रेमयोग’. या दीर्घ कवितेत प्रारंभीच ते म्हणतात,प्रेम कुणावर करावं? कुणावरही करावं, राधेच्या वत्सल स्तनावर करावं,कुब्जेच्या विद्रुप कुबडावर करावंप्रेम कुणावरही करावंकोणत्याही कवीचा आणि कवितेचा अवकाश सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी असतो, असे म्हणतात. त्यामुळे साक्षात कुसुमाग्रजांसारख्या कविश्रेष्ठानी अशी प्रेममय मोकळीक दिल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी लालूप्रसादांवर आणि लालूंनी त्यांच्यावर मन:पूत प्रेम करण्याला कोणाचीच आडकाठी असण्याचे कारण नाही. त्यामुळेच लालूंनी अनेक नेत्रांच्या साक्षीने केजरीवालांवर केलेल्या आपल्या वात्सल्यपूर्ण प्रेमाचा सहर्ष स्वीकार करण्याऐवजी लालूंच्या मनी वसणाऱ्या प्रेमभावनेचा जराही विचार न करता तिचा अव्हेर करावा, हे काही बरे झाले नाही. पण खरे तर तसेही काही झालेले दिसत नाही. सामाजिक माध्यमे नावाच्या ज्या भोचक प्रकाराचा उच्छाद अलीकडच्या काळात बोकाळत चालला आहे, त्यांच्यामुळेच बहुधा केजरीवालांनी स्वत:च्या मनावर दगड ठेवीत लालूंच्या प्रेमाचा अस्वीकार केला असावा, असा निष्कर्ष काढण्याइतपत पुरेसा परिस्थितीजन्य पुरावा उपलब्ध आहे. बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ ग्रहण करण्यासाठी जो सोहळा आयोजित केला गेला होता, त्या सोहळ्यात लालूंनी अचानक आपला हात स्वत:च्या हाती घेऊन उंच हवेत फडकविला व आपली गळाभेट घेतली पण लालूप्रसाद, त्यांचे राजकारण, त्यांचा भ्रष्टाचार आणि त्यांचे स्वत:चाच वंश पुढे चालवीत राहाणे आपणास अजिबात मान्य नाही, असा खुलासा केजरीवालांनी केला आहे. त्यांच्या या खुलाशाचा संक्षेपातील अर्थ म्हणजे लालंूनी त्यांच्यावर एकप्रकारे ‘अतिप्रसंग’च केला. परंतु हा अतिप्रसंग होत असतानाची जी छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत, त्या चित्रांमधील केजरीवालांच्या चेहऱ्यावरील भाव मात्र कोणत्याही स्वरुपाच्या शारीरिक बळजबरीची साक्ष देत नाहीत. याचाच अर्थ भोचक माध्यमांच्या दडपणाखाली येऊन त्यांनी खुलासा केला. खरे तर तो करण्याची गरज काय हा यातील मोलाचा आणि प्रेमाचाही सवाल. जर प्रेम कोणावरही करण्याची मुभा असेल तर एकटे लालू या वैश्विक संदेशाला अपवादभूत का ठरावेत किंवा केजरीवालांनी त्यांना तसे का ठरवावे? एरवी प्रत्येक बाबतीत अत्यंत चोखंदळ म्हणून ज्यांची ख्याती वर्णिली जाते, ते महानायक अमिताभ बच्चनदेखील अमरसिंह, मुलायमसिंह, अखिलेश आणि तत्सम प्रभृतींच्या प्रेमात पडले आहेतच ना? मग लालूंवर प्रेम करायला केजरीवालांनी का कचरावे? त्यातून भारतीय लोकशाहीने रुजू केलेल्या अनेक नव्या दंडकांपैकी एक दंडक असे सांगतो की, भले न्यायालये एखाद्या पुढाऱ्याला दोषी ठरवू देत, पण त्याने निवडणुकीच्या माध्यमातून एकदा का आपली लोकप्रियता सिद्ध केली की मग सारे कसे निर्मळ होऊन जाते. हे दिव्य पार पाडून लालूप्रसाददेखील आज अत्यंत पवित्र बनले आहेत. इतके पवित्र की बिहारच्या मुख्यमंत्रिपदी जरी नितीशकुमार विराजमान झाले असले तरी विधानसभेतील सर्वाधिक डोकी लालूंच्याच इशाऱ्यावर डोलणारी आहेत. मुद्दलात बिहार विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपाला तिची जागा दाखवून देण्याचा जो विचार समस्त तथाकथित निधर्मी पक्षांमध्ये बळावला, त्याचे म्होरकेपण लालूंकडे होते आणि तेव्हांही ते देशाच्या भ्रष्टाचार विरोधी कायद्याच्या कचाट्यात अडकलेले आणि शिक्षा झालेले गुन्हेगारच होते. तरीही केजरीवालांनी लालू-नितीश-काँग्रेस या महागठबंधनला आपला ‘नैतिक’ पाठिंबा जाहीर केला होता. दिल्लीचे राज्य चालविताना केन्द्रातील मोदी सरकार आणि नायब राज्यपाल नजीब जंग हे राहू-केतुच्या भूमिकेत वावरत असल्याचा केजरीवालांचा स्थायी आरोप आहे आणि म्हणूनच ते महागठबंधनच्या मागे उभे राहिले. याचा अर्थ त्यांनी तेव्हां नितीशकुमारांच्या कार्यशैलीवर, काँग्रेस पक्षाच्या फरफटत जाण्यावर आणि लालूप्रसादांच्या भ्रष्टाचारावर सारखेच प्रेम केले होते. जेव्हां भाजपाने नरेन्द्र मोदी यांचे नाव लोकसभा निवडणुकीच्या अगोदरच पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले तेव्हांच नितीश यांनी बिहारातील भाजपाशी असलेली युती संपुष्टात आणून मागचा पुढचा विचार न करता आपले सरकार पणाला लावले होते. त्याच धर्तीवर आपले समर्थन हवे असेल तर निवडणूक एकट्याने लढा पण भ्रष्टाचारी लालूंना सोबत घेऊ नका अशी अट काही केजरीवालांनी नितीशकुमारांपुढे ठेवली नव्हती. लालूंसहवर्तमान महागठबंधन साकारले तेव्हांही ते मौनच राहिले. पण त्याचे कारणदेखील तसे उघडच आहे. राजकीय स्वार्थ हीच सांप्रतच्या काळातील सुसंस्कृती ठरली आहे आणि म्हणून याच कवितेत तात्यासाहेब शेवटी जे म्हणतात, तेही महत्वाचे आहे. प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांशत्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणिभविष्यकालातील त्याच्या अभ्युदयाची आशा एकमेव !
तुझ्या गळा, माझ्या गळा...!
By admin | Published: November 24, 2015 11:33 PM