शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

स्मृती सोबतीला असा तुझा हा प्रवास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2015 3:14 AM

जन्माला आलेला प्रत्येक जीव एक ना एक दिवस जातो, हे त्रिकालाबाधीत सत्य असले तरी या भूतलावर काही पाखरे अशी असतात की जी जाताना आपल्या कर्तृत्वाच्या खुणा स्मृतीच्या

जन्माला आलेला प्रत्येक जीव एक ना एक दिवस जातो, हे त्रिकालाबाधीत सत्य असले तरी या भूतलावर काही पाखरे अशी असतात की जी जाताना आपल्या कर्तृत्वाच्या खुणा स्मृतीच्या रूपाने ठेऊन जातात. ज्येष्ठ कवी महाराष्ट्र भूषण मंगेश पाडगावकर त्यापैकीच एक. ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ असा जगण्याचा आंतरिक मौलिक सल्ला देणारे आणि ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असते, तुमचे आणि आमचे सेम असते’ इतक्या सहजसुलभ शब्दात प्रेममाहात्म्य सांगणाऱ्या काव्यविश्वातील अखंड लखलखणाऱ्या या ताऱ्याने बुधवारी सकाळी वयाच्या ८६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आणि अवघ्या काव्यरसिकांना शोकसागरात बुडवून हा आनंदयात्री अनंताच्या प्रवासाला निघून गेला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्याच्या कसदार भुईतून उगवलेला हा प्रतिभासंपन्न कवी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षीच कवितेच्या प्रेमात पडला होता. मराठी व संस्कृत या दोन विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी काही काळ मुंबईच्या रूईया महाविद्यालयात अध्यापनाचेही काम केले. पण त्यात फार काळ न रमता त्यांनी काव्यसंसार फुलवण्यावरच लक्ष केंद्रीत केले. साहित्याच्या माध्यमातून लोकाना ब्रह्मज्ञान शिकविणाऱ्या अनेक साहित्यिकांच्या तळाशी पावलोपावली आपल्याला विरोधाभासाचा काळोख दिसून येतो, मात्र पाडगावकर त्यास अपवाद होते. त्यांचे लिहिणे ,बोलणे, वागणे, जगणे यात काहीही भेद नव्हता. इतकी पारदर्शकता, नितळता आणि शब्दाशी इमान राखण्याची अस्सलता त्यांच्यात ठासून भरलेली होती. कविश्रेष्ठ बा. भ. बोरकर आणि कविकुलगुरू कुसुमाग्रजांच्या काव्याच्या प्रभावाखाली सुरू झालेला त्यांचा प्रवास दिवसेंदिवस बहरतच गेला. बोरकर-कुसुमाग्रजांच्या काव्यशैलीचे अनुकरण न करता पाडगावकरांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आणि तीच काव्यरसिकांना खऱ्या अर्थाने भावली. ‘सलाम’ आणि ‘प्रेम म्हणजे...’ या दोन कविता त्यांच्या तोंडून ऐकणे म्हणजे रसिकांना एक पर्वणीच वाटायची. बालकविता, भावगीते, प्रेमकविता, निसर्ग कविता व चिंतनशील कविता अशा भावविभोर व सर्वस्पर्शी कविता लिहिताना या कवीने आयुष्यभर मिश्किलपणा कसा जपला हे कोडे भल्याभल्यांना आजवर उलगडलेले नाही. ‘कुठे शोधिसी रामेश्वर’ हे भावगीत असो की ‘शुक्रतारा, मंद वारा’, ‘मान वेळावूनी धुंद बोलू नको’, ‘दिवस तुझे हे फुलायचे’, ‘दिल्या घेतल्या वचनांची’ ही प्रेमगीते असो वा ‘सांग सांग भोलानाथ’ हे बडबडगीत असो ही अजरामर आणि सर्वमुखी फेर धरणारी गीते म्हणजे पाडगावकरांनी महाराष्ट्राला दिलेली देनंच म्हणावी लागेल. ‘धारानृत्य’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह पण त्यांना खरी ओळख, मान-सन्मान दिला तो ‘जिप्सी’ आणि ‘सलाम’ या काव्यसंग्रहांनी. ‘सलाम’ला १९८० साली साहित्य अकादमीने पुरस्काराच्या माध्यमातून ‘सलाम’ ठोकला आणि हा कवी लाखो चाहत्यांच्या हृदयसिंहासनावर कायमचा आरूढ झाला. अनेक मान-सन्मान त्यांच्या वाट्याला आले तरी ती विशेषणे ‘मंगेश पाडगावकर’ या दोन शब्दांपुढे थिटी वाटावीत इतके रसिकप्रेम त्यांना लाभलेले होते. त्यानंतरच्या काळात पाडगावकरांनी ‘निंबोणीच्या झाडामागे’, ‘छोरी’, ‘शर्मिष्ठा’, ‘विदूषक’, ‘भोलानाथ’, ‘भटके पक्षी’ यासह ३२ हून अधिक काव्यसंग्रह, वात्रटिका, मीराबार्इंच्या भजनांचा आणि कबीरांच्या दोह्यांचा अनुवाद तर केलाच शिवाय ‘वादळ’ आणि ‘ज्युलिअस सीझर’ या नाटकांचे लेखनही केले. काव्यवाचनाचा प्रकार फारसा रूढ नसतानाच्या १९६० ते ७० च्या दशकात कविता जनसामान्यांपर्यंत पोहचावी आणि साहित्यिक केवळ साहित्यसंमेलनातच भेटतात हा समज खोडून काढण्यासाठी विंदा करंदीकर, वसंत बापट व पाडगावकर या त्रयीने कविता सादरीकरणाचे अनोखे असंख्य प्रयोग महाराष्ट्रभर केले. गावोगावी कवितेला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र भूषण’ सन्मानाने त्यांना अलंकृत केले तरी या कवीचे पाय अखेरपर्यंत मातीचेच राहिले. अहंकाराचा वारा अंगाला स्पर्शू न देणारा हा कवी आयुष्यभर काव्यरसिकांच्या ऋणात राहणेच पसंत करीत राहिला. केवळ तुमच्यामुळेच माझ्या कवितांना आणि मलाही अस्तित्व आहे अशी प्रांजळ कबुली देताना ‘इतकं दिलंत तुम्ही मला, खरं सांगतो माणूस केलंत तुम्ही मला’ असे सांगायला हा कवी कधी विसरला नाही. महाराष्ट्र भूषण ‘पुल’नी जसे महाराष्ट्राला हसणे शिकवले तसे पाडगावकरांनी महाराष्ट्राला प्रेम करायला शिकवले. ज्याच्या स्मृती अनंत काळपर्यंत जपाव्यात इतका ‘पाडगावकर पर्वा’चा प्रवास सुंदर राहिला. समस्त मराठीजनांच्या हाती कवितेचे अक्षरलेणं देऊन झाल्यानंतर आजही रसिकांना हवेहवेसे वाटत असतानाच ते एकाएकी निघून गेले. त्यामुळे पाडगावकर आता तुम्हीच सांगा, काव्यरसिकांनी कसं जगायचं...कण्हत कण्हत की तुमचं गाणं म्हणत?