- किरण अग्रवालआपत्ती ही केवळ नुकसानदायीच असते असे नाही, तर ती बरेच काही शिकवून जाणारीही असते. कोणताही मनुष्य त्याच्या धाडस व बेडरपणाच्या कितीही गप्पा मारीत असला तरी आपत्ती काळातच त्यातील या गुणवैशिष्ट्यांची परीक्षा होते, कारण एरव्ही इतरांना हितोपदेश करणे वेगळे आणि स्वत:ला बिकट प्रसंगातून जावे लागते तेव्हा त्यातून येणारा अनुभव अगर जागणारे आत्मभान वेगळे असते. हे भान बऱ्याचदा तात्कालिकतेच्या सीमेवरच अडखळते. आपत्तीचे स्वरूप कसे व किती आहे, यावर ते अवलंबून असते. परंतु छोट्याशा प्रसंगातूनही मोठा धडा घेण्याचा सुज्ञपणा ज्यांच्या ठायी असतो, ते आपत्तीतून लवकर सावरतात, शिवाय अशांना आलेले भान प्रासंगिक न राहाता सर्वकालीन जाणिवेची प्रगल्भता गाठते तेव्हा अंतरीचे झरे आपसूकच झरझर प्रवाहीत होतात. स्नेहाचे, प्रेमाचे, आपलेपणाचे पदर त्यातूनच ओलावतात. माणुसकी धर्म वेगळा काय असतो? कोरोनाच्या संकटकाळात व त्यानंतरच्या निसर्ग चक्रीवादळामुळे हा धर्म जागवणारे भान प्रत्ययास येत आहे हेच समाधानाचे म्हणता यावे.संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार माजवला असतानाच आता ‘निसर्ग’नामक चक्रीवादळाचे संकट राज्याच्या किनारपट्टीवर येऊन आदळले आहे. सुमारे दोन-अडीच महिन्यांपासून कोरोनाशी लढाई सुरू आहे. थेट जिवाशी गाठ घालणारा हा विषाणू असल्याने शासन-प्रशासन तर काळजी घेत आहेच; परंतु व्यक्तिगत पातळीवरही सुज्ञ असलेले सारेच जण स्वत:सह कुटुंबीयांची काळजी घेताना दिसत आहेत. सध्या कोरोनामुळे बहुतेकांना सक्तीचे रिकामपण लाभले आहे. रिकामपणात माणूस अधिक सोशल किंवा सामाजिक व सार्वजनिकही होतो असे म्हटले जाते. त्यानुसार हाती असलेल्या मोबाइलच्या माध्यमातून सारेच जण एकमेकांच्या ख्याली-खुशालीची विचारपूस करीत खबरदारी घेण्याचे सल्ले देत आहेत. भलेही रिकामपणातला उद्योग याला म्हणता यावे; पण यानिमित्ताने का होईना इतरांबद्दलची आपुलकी जागल्याचा प्रत्यय येतो आहे, ते का कमी आहे? अगदी दिवाळी-दसºयाला शुभेच्छांची देवाण-घेवाण होत नाही त्यापेक्षा अधिक प्रमाणात ‘कोरोना’पासून बचावण्यासाठी संदेशाचे आदान-प्रदान होत आहे. दुस-याचे सुख हे द्वेषाचे-ईर्षेचे कारण भलेही ठरू शकते; परंतु दु:ख, संकटकालीन वेदना मात्र मनुष्याला जवळ आणतात, पाझर फोडतात; हेच खरे असल्याचे या निमित्ताने दृग्गोचर व्हावे.कोरोनाच्या सोबत आलेल्या चक्रीवादळाच्या भीतीनेही अनेकांच्या संवेदना जागविल्या. कोकणच्या किनारपट्टीवर हे वादळ धडकणार व तेथे नुकसान घडून येणार म्हटल्यावर त्या परिसरातील आप्तेष्ट, इष्ट-मित्रांचे मोबाइल नंबर्स शोधून शोधून व संपर्क करून त्यांना धीर दिला गेला. विस्मृतीत गेलेले अनेकांचे स्नेह-संबंध या आपत्तीच्या निमित्ताने पुन्हा नियमित व्हायला जणू संधी मिळून गेली. तेव्हा आपत्तीने घडून गेलेल्या किंवा येत असलेल्या नुकसानीचीच चर्चा करण्याऐवजी, हे जे काही परस्परांबद्दलचे ममत्त्व जागताना दिसत आहे; त्यातून नाते वा मित्रत्वाच्या संबंधाची वीण घट्ट होताना दिसत आहे ते अधिक महत्त्वाचे ठरावे. यानिमित्ताने या हृदयीचा त्या हृदयाशी होणारा संपर्क-सत्संग हा केवळ आपत्तीशी लढण्याचे बळ देणाराच नव्हे तर माणुसकी धर्माची पताका उंचावणाराही आहे. याच माणुसकी धर्माच्या जागरणासाठी आपले आयुष्य वेचून गेलेल्या सर्वच संत-महात्म्यांनी अश्रूंचेच मोल समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आपत्तीमुळे धीर खचत असला तरी, सहवेदना व सहयोगाच्या बळावर कोणतीही लढाई सहज जिंकता येते असे साधे सूत्र यामागे आहे. आज कोरोना असो की चक्रीवादळ, या आपत्तीच्या निमित्तानेही हेच सूत्र प्रत्येकाला उभारी देणारे व यशस्वीतेचा आशावाद जागवणारे ठरले आहे.महत्त्वाचे म्हणजे, ही संकटे मनुष्याला आत्मवलोकनाची संधी देऊन जात आहेत. जात, धर्म, गरीब-श्रीमंत असा कुठलाही भेदाभेद न ठेवता संकटांनी सर्वांनाच ग्रासले आहे. सामान्य नागरिकांपासून बलाढ्य देशांच्या वरिष्ठाधिकाऱ्यांपर्यंत सा-यांना भीतीच्या छायेत आणून ठेवले आहे. जिवाची भीती ही केवळ स्वत:च्याच काळजीला नव्हे तर इतरांबद्दलच्या आपुलकीलाही प्रवृत्त करीत असते. शेवटी जाताना काय सोबत येणार, असाच विचार या भीतीतून डोकावल्याखेरीज राहात नाही. असे जेव्हा होते तेव्हा रागा-लोभाच्या भिंती ढासळून पडतात. शिक्षणातही न आलेले शहाणपण अशावेळी अध्यात्माच्या मार्गाने येते. दगडात देव दिसू लागतातच, परक्यातही आपलेपणा दिसू लागतो. निर्वैरत्व व निर्माेहीत्व जे काही असते, ते या स्थितीत प्रसवते. काम, क्रोध, मद, मोह-मत्सर या षड्रिपूंपासून सुटकेचीच ही अवस्था असते. एरव्हीच्या सामान्यपणे जगण्यात हे टाळता येणारे नसते. मात्र संकट जेव्हा घोंगावते तेव्हा सारे गळून पडते. प्रश्न इतकाच की, संकटात वा दु:खातच हे शहाणपण का सुचते? अर्थात संत कबिरांनीही तेच तर म्हटलेय, ‘दु:ख में सुमरिन सब करे, सुख में करे न कोय। जो सुख में सुमरिन करे, दु:ख काहे को होय!!
आपत्तीतून आलेले आपलेपण!
By किरण अग्रवाल | Published: June 04, 2020 9:02 AM