‘चलाओ तलवार!’ असं म्हणत रोहित शर्मा पत्रकारांना सामोरा जातो, तेव्हा कप्तान म्हणून त्याने सांघिक अपयशाची जबाबदारी स्वीकारलेलीच असते. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत, पहिल्या डावात भारताचा संपूर्ण संघ फक्त ४६ धावा करून बाद झाला. मधली फळी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली आणि कोहलीसह ५ फलंदाज शून्यावर परतले. मात्र, पत्रकारांच्या प्रश्नांच्या तोफा धडाडण्यापूर्वीच कर्णधार शर्माने कुणाही संघसहकाऱ्याला दोष न देता, काहीही कारणे न सांगता मान्य केले की, माझाच अंदाज चुकला, धावपट्टी नीट उमगली नाही. संघाच्या लज्जास्पद पडझडीची जबाबदारी कप्तानने स्वीकारणे हे सांघिक खेळाचे पहिले सूत्र! सभ्य माणसांचा खेळ म्हणवणाऱ्या क्रिकेटमध्ये अजून ‘इतपत’ सभ्यता टिकून आहे, म्हणायची! अर्थात कसोटी क्रिकेटची खासियतच ही की, प्रत्येक संघाला आणि प्रत्येक खेळाडूला ‘सेकंड इनिंग’ची संधी असते. त्यामुळे पहिल्या-दुसऱ्या दिवसाच्या खेळावर हार-जीतची समीकरणे मांडू नयेत. कारण, अंतिम हार-जीत ठरते ती संघातल्या प्रत्येक खेळाडूची सामना फिरवण्याची क्षमता, जिद्द, शारीरिक, मानसिक ताकद आणि सांघिक एकजुटीवर.
भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या गेल्या काही वर्षांतल्या सातत्यपूर्ण यशात हे सारे दिसते, मात्र भारतीय महिला क्रिकेट संघाचे काय? गेली काही वर्षे भारतीय महिला क्रिकेट संघ मोक्याच्या क्षणी हाराकिरी करतो, कोसळतो. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळताना ना एकजूट दिसते, ना संघाचे ‘इंटेट’. हे खरेच आहे की, एकेकाळी भारतीय महिला क्रिकेटला भातुकली म्हणून हिणवले गेले. महिला क्रिकेटपटूंना ना पुरेसे पैसे मिळत होते, ना सुविधा. ना ओळख, ना ग्लॅमर, ना संधी. पण आता तो भूतकाळ झाला.
महिला क्रिकेट संघाला आता पुरुष संघाइतकेच वेतन मिळते आणि त्याच दर्जाच्या सर्व सुविधाही मिळतात. बीसीसीआयने दोन वर्षांपूर्वीच निर्णय घेतला की, आता भारतीय महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंना समान वेतन मिळेल, त्यांच्यातली वेतनदरी कायमची बुजविण्यात येईल. महिला क्रिकेटचे सामने ‘लाइव्ह’ दिसू लागले. पुरुष खेळाडूंना मिळणाऱ्या सर्व सुविधाही मिळाल्या, ही अभिनंदनीय गोष्ट आहे आणि महिला खेळाडूंचा तो हक्कच आहे. पण, महिला खेळाडूंना सुविधा सर्व मिळणार मात्र त्यांच्यावर कुणीही टीका करायची नाही, त्यांना ‘समजून’ घ्यायचे, डोळ्यातले पाणी पुसू द्यायचे नी सततचे सांघिक अपयश, वारंवार होणाऱ्या चुका विसरून जायच्या, हे कसे मान्य करता येईल? २०१६ पासून हरमनप्रीत कौर महिला संघाची कप्तान आहे. फलंदाज म्हणून हरमनप्रीत उत्तमच खेळाडू असली, तरी कप्तान म्हणून तिच्या उणिवा ठळक दिसतात. संघात सतत कलह खदखदत असतो. नुकत्याच पार पडलेल्या टी-२० विश्वचषकात भारतीय महिला संघ साखळी फेरीतच बाद झाला. त्यानंतर हरमनप्रीतची कप्तानी जाणार अशी चर्चा होती. मात्र, बीसीसीआयने पुन्हा तिच्यासह प्रशिक्षक अमोल मुजूमदार यांच्यावर विश्वास ठेवला. न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी पुन्हा हरमनप्रीतच कप्तान असेल. अशी वारंवार संधी मिळूनही संघातल्या उणिवा मात्र तशाच आहेत.
महिला खेळाडूंच्या शारीरिक, मानसिक तंदुरुस्तीवर काम केले जात नाही, त्यामुळे मोक्याच्या क्षणी शारीरिक क्षमता कमी पडून खेळाडू विकेट फेकतात. ‘रनिंग बिटविन द विकेट’ हा या संघातला अत्यंत कच्चा दुवा आहे, तेच क्षेत्ररक्षणाचेही. अटीतटीच्यावेळी अत्यंत सोपे झेलही घेता न येणे, ताण सहन करण्याची क्षमताच नसणे, खेळाडूंना संघातले आपले नेमके स्थान काय हेच माहिती नसणे, परस्पर संवादाचा अभाव, अशी अनेक कारणे अपयशाच्या विश्लेषणात सहज दिसतात. स्वत: कप्तानालाच ठरवता येत नाही की, आपण कोणत्या क्रमांकावर खेळणार! हरमनप्रीत कधी तिसऱ्या क्रमांकावर खेळते, तर कधी जेमिमा. शफाली वर्माचे ‘नवा सेहवाग’ म्हणून वारेमाप कौतुक होत असताना, ती फॉर्मशी झगडतेच आहे, मोक्याच्या क्षणी बाद होते. स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, रिचा घोष सातत्याने अपयशी ठरत आहेत. २०२२ राष्ट्रकुल स्पर्धा, आशिया चषकाची अंतिम फेरी ते नुकताच झालेला टी-२० विश्वचषक. भारतीय महिला क्रिकेट संघाने सतत अपयशच पाहिले. २०२५ मध्ये एकदिवसीय विश्वचषक आहे, त्यासाठीची तयारी हा संघ कधी करणार? केवळ पैसा ओतण्यापलीकडे हा ‘संघ’ म्हणून यशस्वी व्हावा, यासाठी बीसीसीआयही कधी प्रयत्न करणार? आणि रिल्स करून प्रसिद्धी मिळविण्यापलीकडे महिला क्रिकेटपटू मैदानावरची कामगिरी कधी उंचावणार? सध्या भारतीय क्रिकेटमध्ये शून्य भोपळे इतके दिसतात की, प्रश्नांच्या तलवारींची धार कमी होणे शक्य नाही!