विकासाच्या कामात आणि योजना अंमलबजावणीत राज्यात आघाडी मारत असताना रेकॉर्ड (अभिलेख) जतन पद्धतीचे अभिनव ‘भारुड’ गाजत आहे. त्याचे कर्ते आहेत डॉ. राजेंद्र भारुड !
ग्रामीण माणसाच्या जीवनात क्रांती आणण्याची क्षमता ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असल्याचे सिद्ध झालेले आहेच. त्या क्रांतीचा आधार हा वेगवेगळ्या कल्पना, प्रशासकीय पद्धती, शासकीय नियम आणि अंमलबजावणीची कार्यपद्धती या अनुषंगाने झालेल्या प्रत्येक कृतीचे वर्षानुवर्षे आदर्श पद्धतीने जतन केलेले रेकॉर्ड (अभिलेख) असते. नेमका हाच आधार ठिसूळ बनल्याचा अनुभव आपल्याला अनेक शासकीय कार्यालयात येतो. त्याचाच परिणाम म्हणून अधिकारी कितीही कार्यक्षम आणि प्रामाणिक असला व कामही कायद्याच्या चौकटीत बसणारे असले तरी ते रेंगाळत राहते. विविध आघाड्यांवर एका जमान्यात राज्यात ३० व्या क्रमांकावर असणाºया जिल्हा परिषदेला राज्यात पहिल्या पाचमध्ये आणण्याची किमया करणाºया जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी याच समस्येवर विशेष काम केले आहे. याच कामामुळे राज्यातील जिल्हा परिषदांच्या सर्वच विभागांचे रेकॉर्ड्स जतन पद्धतीत नवे क्रांतिकारी बदल आणू शकणाºया कार्यपद्धतीचे ‘भारुड’ राज्यात रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.पाच महिन्यात ७१ हजार शौचालयांचे बांधकाम, शौचालयांचे अनुदान आॅनलाईन प्रणालीने वितरणाची सुविधा, राज्यातील वारकºयांच्या जिव्हाळ्याच्या व श्रद्धेच्या आषाढी यात्रेत ‘पंढरीच्या दारी-स्वच्छतेची वारी’सारखे उपक्रम, १२ हजार अधिकारी-कर्मचाºयांना सोबतीला घेऊन पंढरपुरात महास्वच्छता अभियान अशा अनेक उपक्रमांची मालिका गुंफणाºया डॉ. राजेंद्र भारुड यांनी प्रशासनात अभिलेख विभागाला वेगळे वळण देणारी नवी व्यवस्था निर्माण केली. ज्यामुळे शासनाच्या ‘झीरो पेडन्सी’ धोरणाला नवसंजीवनी मिळाली. ती व्यवस्था उभी करताना अभिलेख इमारतीचे काम अद्ययावत कसे राहील, याची काळजी त्यांनी वाहिली. तेथे अद्ययावत सुविधा उपलब्ध करून जि.प.स्तरावर तब्बल एक लाख ४० हजार ३६१ एवढ्या अभिलेखांच्या जतनाची सोय केली. कोणत्याही संदर्भ व कागदाची ज्यावेळी गरज असेल त्यावेळी ते सहज आणि तातडीने उपलब्ध व्हावे, त्यातही अ, ब, क अशी वर्गवारी करूनच अभिलेख जतनाची मांडणी केली. आज अ वर्गातील ३८ हजार ६६०, ब वर्गातील ४५ हजार ७२२, तर ‘क’ वर्गातील ५६ हजार २४९ अभिलेखांचे जतन करण्यात आले आहे. अभिलेखगृहाच्या तीन मजली जुन्या इमारतीचे आधुनिकीकरण करून तेथे अभिलेख माहितीचा गोषवारा, वर्गवारी प्रत्येक वर्षानुसार त्याची मांडणी हे करताना एकाच इमारतीत १६ विभागांचे रेकॉर्ड शिस्तबद्ध पद्धतीने जतन केले गेले. रेकॉर्ड रूम म्हटले की, अस्ताव्यस्त फाईल्सचा खच आणि अस्वच्छता असा आपला अनुभव असतो. डॉ. भारुड यांनी मात्र केवळ प्रशासकीय पद्धती व वर्गीकरणावर भर न देता त्याला स्वच्छता व टापटीपीची जोड दिली. जि.प.चे अध्यक्ष संजय शिंदे आणि जि.प.च्या सर्व पदाधिकाºयांना साथीला घेऊन १२ हजार ६९० घरकुलांना अनुदान वाटप करणे, तीन हजार घरकुले अवघ्या पाच महिन्यात पूर्ण करणे, जिल्ह्यातील ४६९ शाळांना आयएसओ दर्जा प्राप्त करण्याची क्षमता निर्माण करणे, १४५७ शाळांना डिजिटल बनविणे अशा महत्त्वपूर्ण कामाला त्यांनी दिलेल्या अभिलेख जतन पद्धतीच्या जोडीचा राज्याला उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही.