मुंबई : मुंबई विभागात अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत एक लाख ०८ हजार ०७१ जागा रिक्त राहिल्या आहेत. यात सर्वांत जास्त विज्ञान शाखेच्या ४६,९२०, त्यानंतर वाणिज्यच्या ४२,५२३ तर कला शाखेच्या १६,२२४ जागा रिक्त राहिल्या आहेत. एचएसव्हीसी अभ्यासक्रमाच्या २,४०४ रिक्त जागांचाही यात समावेश आहे. सर्वांत जास्त १,३४,७३३ प्रवेश हे वाणिज्य शाखेत झाले. एसईबीसी संवर्गासाठी यंदा एकूण १० टक्के जागा वाढविण्यात आल्या, त्याचा फटका बसून रिक्त जागांच्या संख्येत वाढ झाल्याचे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे.
मुंबई विभागात यंदा प्रवेशासाठी ३,२६,७९६ जागा होत्या. यापैकी १,८८, ८२४ जागा या आॅनलाइन प्रवेशासाठी तर १,३७,९७२ जागा या कोटा प्रवेशासाठी होत्या. त्यातील एकूण २,१८,७२५ जागांवर प्रवेश निश्चिती झाली. अकरावीच्या एकूण प्रवेशांत राज्य मंडळाच्या १,९७,४८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. तर सीबीएसईच्या ७,१८३, आयसीएसई १०,१२४, आयजीसीएसई १२०६, आयबी १०, एनआयओएसच्या ७१३ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले. यात इतर मंडळाचे २,००२ विद्यार्थी आहेत. खुल्या वर्गातून प्रवेश घेणाऱ्याची संख्या १,५७,०९६ तर एसईबीसी संवर्गातून प्रवेश घेणाऱ्यांची संख्या फक्त ५,६६२ आहे. आर्थिक दुर्बल घटकांतून केवळ १,४२९ तर इतर मागास प्रवर्गातूून २४,४२७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले.मुंबईत सर्वाधिक एक लाख ०८ हजार जागा रिक्तयंदाही अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे ते चर्चेत राहिले. राज्य मंडळाचा दहावीचा निकाल कमी लागल्याने सीबीएसई, आयसीएसई मंडळांच्या तुलनेत कमी गुण असलेल्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयांतील प्रवेशांपासून वंचित राहावे लागले. यावर पर्याय म्हणून राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालये मिळावीत यासाठी काही महाविद्यालयांना १० टक्के जागा वाढवून देण्याचा निर्णय घेतला. परिणामी, उपलब्ध जागांची संख्या वाढली. विद्यार्थ्यांच्या तुलनेत उपलब्ध जागा मुळातच जास्त असताना, त्यात १० टक्के वाढीव जागांची भर पडली. मुंबईत सर्वाधिक एक लाख ०८ हजार ०७१ जागा रिक्त राहिल्या आहेत.