मुंबई
दहावी बारावीच्या ऑगस्ट महिन्यात झालेल्या पुरवणी परीक्षांचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे.
दहावी पुरवणी परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण २०५१७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १९०४२ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले व त्यापैकी ५८०३विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ३०.४७ आहे. एक किंवा दोन विषयात उत्तीर्ण न होऊ शकलेल्या एकूण विद्याथ्र्यांची संख्या ७६४२ एवढी आहे. हे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये ए.टी.के. टी. सवलतीद्वारे इयत्ता ११ वी च्या प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत.
बारावीच्या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व एचएससी व्होकेशनल या शाखांतील एकूण ५४०५८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५३५४७ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले व त्यापैकी १७२८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ३२.२७ आहे.
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. या संकेत स्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध होणार आहेत. ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुस-या दिवसापासून दहावी, बारावी पुरवणी परीक्षेस प्रविष्ठ झालेलया विद्यार्थ्यास स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने शाळा, महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
गुणपडताळणीसाठी शनिवारपासून करा अर्जगुणपडताळणीसाठी ३ ते १२ सप्टेंबर पर्यंत व छायाप्रतीसाठी ३ ते २२ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन पध्दतीन अर्ज करता येईल. उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असेल.