मुंबई : यंदाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाइन म्हणजेच नियमित मूल्यांकन पद्धतीने होणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले. सोबतच दहावीच्या लेखी परीक्षा १५ मार्च २०२२ ते १८ एप्रिल २०२२ यादरम्यान, तर बारावीच्या लेखी परीक्षा ४ मार्च २०२२ ते ७ एप्रिल २०२२ यादरम्यान पार पडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
दहावी व बारावीचे वेळापत्रक राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून तयार होते. मात्र, बऱ्याच दिवसांपासून ते सरकारी पातळीवर मंजुरीसाठी प्रलंबित होते. अखेर शिक्षण विभागाकडून या वेळापत्रकाला मंजुरी मिळाली आहे. यंदाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा प्रचलित पद्धतीनेच होणार असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले. दहावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी/ अंतर्गत गुणांच्या परीक्षा या २५ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२२ दरम्यान, तर बारावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी/ अंतर्गत परीक्षा या १४ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२२ दरम्यान पार पडतील, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.
कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे पालन करीत परीक्षा व्यवस्थितरीत्या पार पडल्यानंतर बारावीचा निकाल जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत, तर दहावी परीक्षेचा निकाल जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यांपर्यंत जाहीर करण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न राहील, असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
उर्वरित अभ्यासक्रमावरच परीक्षाकोरोनाच्या पार्श्वभूमीवर अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत उर्वरित अभ्यासक्रमावरच प्रश्न विचारले जाणार आहेत. याशिवाय प्रात्यक्षिक, श्रेणी/ तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व आउट ऑफ टर्न परीक्षा ५ ते २५ एप्रिल २०२२ या कालावधीत घेण्यात येतील. इयत्ता दहावीसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयाची परीक्षा ५ ते १९ एप्रिल २०२२ या कालावधीत होणार आहे.
सीबीएसई परीक्षा केंद्रे दुपटीपेक्षा अधिकइयत्ता १० वी व १२ वीच्या सत्र परीक्षेच्या केंद्रांमध्ये दुपटीपेक्षा अधिक वाढ करण्याचा निर्णय सीबीएसईने घेतला आहे. कोरोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे.
१० वी व १२ वीच्या परीक्षा दोन सत्रांत घेतल्या जात आहेत. यासाठी देशात ६ हजार केंद्रे होती. परंतु, कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून परीक्षा केंद्रांची संख्या १४ हजार करण्यात आली. या परीक्षा ३० डिसेंबरपर्यंत पूर्ण केल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सीबीएसईने प्राधान्य दिले असून यासाठी हा निर्णय घेतल्याचे सीबीएसईने पत्रकात म्हटले आहे.