मुंबई : इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने म्हणजे लेखी होणार आहेत. या लेखी परीक्षेसाठी वेळही वाढवून देण्यात आली असून सकाळी ११ ऐवजी परीक्षा साडेदहा वाजता सुरू होणार आहे. लेखी परीक्षा या त्याच शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयांत घेण्यात येणार आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे तर बारावीची २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत होईल. या परीक्षा ऑनलाइन घेण्याचा विचार आम्ही केला होता. मात्र राज्याची भौगोलिक परिस्थिती तसेच नेटवर्कची परिस्थिती लक्षात घेता परीक्षा ऑफलाइन घेण्याचे ठरले आहे, असे गायकवाड यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या त्याच शाळेत अथवा कनिष्ठ महाविद्यालयांत या परीक्षा घेण्यात येतील. अपवादात्मक परिस्थितीत वर्ग खोल्या कमी पडल्यास लगतच्या शाळेमध्ये परीक्षा उपकेंद्रात परीक्षा घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
३ तासांच्या पेपरसाठी अर्धा तास जादा वेळकोरोना लॉकडाउन काळात विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाला आहे. त्यामुळे यंदा परीक्षेची वेळही वाढविण्यात आली आहे. दरवर्षी ८० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी ३ तासांची वेळ देण्यात येते. यंदा त्यासाठी ३० मिनिटांचा वाढीव वेळ असेल, तर ४० व ५० गुणांच्या परीक्षेसाठी १५ मिनिटांची वेळ वाढवून देण्यात येईल. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक तासामागे २० मिनिटांचा वेळ वाढवून देण्यात येणार आहे.
बारावी सायन्सची ५-६ प्रात्यक्षिकांवर परीक्षाबारावीच्या लेखी परीक्षेनंतर प्रात्यक्षिक परीक्षा २२ मे ते १० जून या कालावधीत होतील. बारावीच्या सायन्सच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके कमी करण्यात आली असून ५ व ६ प्रात्यक्षिकांवरच परीक्षा घेण्यात येईल.
...तर विशेष परीक्षा घेणारपरीक्षा कालावधीत कोरोना झाल्यास, लक्षणे जाणवत असल्यास किंवा लॉकडाऊन, संचारबंदीमुळे परीक्षा न देऊ शकल्यास अशा विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेतली जाईल. पुरवणी परीक्षा देखील जुलै-ऑगस्ट मध्ये घेण्यात येणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांसाठी ‘प्रॅक्टिकल’ऐवजी ‘असाइन्मेंट’दहावीच्या प्रॅक्टिकल परीक्षांऐवजी ‘असाइन्मेंट’ म्हणजे गृहपाठ पद्धतीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. दहावीला २१ मे ते १० जून या कालावधीत प्रात्यक्षिकऐवजी गृहपाठ सादर करावे लागणार आहेत.