लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अकरावी प्रवेशासाठी मुंबई विभागातून यंदा एकूण ३ लाख २० हजार ७१० जागा उपलब्ध आहेत. यामध्ये वाणिज्य शाखेच्या १ लाख ७४ हजार ५८० जागा. कला शाखेच्या ३७ हजार ७०० जागा, विज्ञान शाखेच्या १ लाख २ हजार २७० जागांचा आणि एचएसव्हीसी शाखेच्या ५ हजार ६६० जागांचा समावेश आहे. मागील वर्षीपेक्षा अकरावीच्या एकूण उपलब्ध जागांमध्ये ४० जागांची घट झाली आहे. यंदा अकरावीत वाणिज्य शाखेच्या जागांत ४०० तर कला शाखेच्या जागांत ७०० ची वाढ झाली असून विज्ञान शाखेत ११४० जागांची घट झाली आहे.
यंदा अंतर्गत मूल्यमापनामुळे दहावीचा निकाल वाढला, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी अकरावीच्या एकूण जागांत वाढ होण्याची शक्यता होती; मात्र एकूण जागांत ४० जागांची घट झाली आहे. दरम्यान, शिक्षण विभागाकडून कोणीही विद्यार्थी प्रवेशाशिवाय वंचित राहणार नाही अशी हमी यापूर्वीच देण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मुंबई दक्षिण विभागात ४८ हजार ४१० जागा उपलब्ध आहेत. मुंबई उत्तर विभागात ५१ हजार २३० जागा तर मुंबई पश्चिम विभागात ९५ हजार ७१० जागा उपलब्ध आहेत.
सोमवारी सायंकाळी अकरावी संकेतस्थळावरील माहितीनुसार अकरावीसाठी २ लाख ३७ हजार ९३९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून २ लाख १९ हजार ५३३ विद्यार्थ्यांचे अर्ज प्रमाणित झाले आहेत. आतापर्यंत ५५९२ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांच्या कोटा व्यवस्थापनातून प्रवेश घेतले आहेत. मुंबई विभागात इनहाऊस प्रवेशासाठी २० हजार ७१६ जागा, अल्पसंख्याक कोट्यासाठी ८७ हजार ८११ जागा तर व्यवस्थापन कोट्यातून १५ हजार ८५३ जागा उपलब्ध आहेत. अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी २७ ऑगस्टला जाहीर होणार असून ३० ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.