लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या तिसऱ्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. या फेरीत १३ हजार विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले आहे, तर अजूनही पाच हजार विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. यंदाच्या फेरीत शहर उपनगरातील काही नामांकित महाविद्यालयाच्या कट ऑफमध्ये दुसऱ्या विशेष फेरीच्या तुलनेत दोन ते चार टक्क्यांनी घट झाली आहे, तर दुसरीकडे काही महाविद्यालयाच्या वाणिज्य, कला आणि विज्ञान शाखेच्या कट ऑफमध्ये पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. आता विद्यार्थ्यांना महाविद्यालय कधी सुरू होणार याची उत्सुकता लागली आहे.
या फेरीनंतर प्रवेशप्रक्रियेतील उर्वरित जागांवर येत्या काळात एटिकेटी आणि फेरपरीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रवेशप्रक्रियेत सामावून घेतले जाणार आहे. मुंबई विभागातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रीय प्रवेशप्रक्रिया आणि कोट्यातील एकूण जवळपास १ लाख ४७ हजार जागा रिक्त होत्या आणि अर्ज केलेल्या जवळपास ४५ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे बाकी होते. तिसऱ्या विशेष प्रवेश फेरीसाठी उपलब्ध असणाऱ्या १ लाख ७ हजार २९८ जागांसाठी एकूण १८ हजार ७०३ विद्यार्थी पात्र होते, त्यातील १३ हजार ४ विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले आहे.
अशी करा प्रवेश निश्चिती विद्यार्थ्यांना स्वतःच्या लॉगिनमध्ये जाऊन कोणते कनिष्ठ महाविद्यालय अलॉट झाले आहे की नाही, हे पाहता येईल. तिसऱ्या विशेष प्रवेश यादीत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना गुरुवार, दि. १० ऑगस्ट सकाळी १० वाजल्यापासून ते शनिवार, दि. १२ ऑगस्ट संध्याकाळी ६ वाजेपर्यंत या कालावधीत प्रवेश निश्चित करायचा आहे.