मुंबई हायकोर्टानं इयत्ता ११ वीच्या प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा रद्द केली. त्यानंतर आता राज्याच्या शिक्षण विभागानं विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी नवा निर्णय घेतला आहे. इयत्ता ११ वीच्या प्रवेशासाठीची प्रक्रिया आता सुरू झाली असून एमएमआरडीए विभागासाठीच्या प्रक्रियेची माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शेअर केली आहे. (11th Asmission in Maharashtra Important information of School Education Minister Varsha Gaikwad regarding 11th admission process)
वर्षा गायकवाड यांनी ट्विटच्या माध्यमातून ११ वी प्रवेश प्रक्रियेची माहिती दिली आहे यात मुंबई, ठाणे, रायगड, पुणे आणि पिंपरी चिंचवड या भागातील ११ वी प्रवेश प्रकिया सुरू झाल्याचं सांगितलं आहे. याशिवाय राज्यातील उर्वरित बागात महाविद्यालय पातळीवर प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
इयत्ता ११ वी प्रवेशासाठी १४ ते २२ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी, विद्यार्थ्यांचे अर्ज, अर्जांची छाननी आणि दुरूस्तीची प्रक्रिया पार पडणार आहे. ऑनलाइन प्रवेश प्रकियेचे वेळापत्रकही गायकवाड यांनी ट्विट केलं आहे. त्यानुसार १४ ऑगस्टच्या सकाळी ११ वाजल्यापासून ऑनलाइन रजिस्ट्रेशनची सुरुवात होणार आहे. यात विद्यार्थ्यी स्वत: लॉग इन आयडी आणि पासवर्ड तयार करुन रजिस्ट्रेशन करू शकणार आहेत.