लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेंतर्गत राज्यात आतापर्यंत सुमारे ४ लाख २० हजार २१३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे आणि अद्यापही एकूण उपलब्ध जागांपैकी १ लाख ६५ हजार ८२२ जागा अद्याप रिक्त आहेत. अकरावी प्रवेशासाठी अर्ज केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ५८ हजार ८० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नाहीत. यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी आयटीआय, पॉलिटेक्निक अशा इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला आहे. दरम्यान, अजूनही अनेक विद्यार्थी विभागीय उपसंचालक कार्यालयांमध्ये अकरावी प्रवेशाची चौकशी करीत आहेत. याच कारणास्तव शिक्षण संचलनालयाकडून अद्यापही अकरावी प्रवेश प्रक्रिया संपल्याची अधिकृत घोषणा केली नसल्याची चर्चा आहे. शिक्षण संचालनालयाकडून ही प्रवेश प्रक्रिया संपली असल्याची अधिकृत घोषणा केली गेली नसल्याने, एकीकडे महाविद्यालयांचे संस्था चालक आणि प्राचार्य याबाबत सातत्याने विचारणा या करीत आहेत.
नागपुरात सर्वाधिक जागा रिक्त अकरावी प्रवेशासाठी सर्व विभागांत उपलब्ध असलेल्या एकूण जागांपैकी मुंबईत अकरावीचे ९० टक्के प्रवेश निश्चित झाले आहेत. या शिवाय अमरावती विभागात ८४ टक्के, नागपूर विभागात ८७ टक्के, नाशिक विभागात ७२ टक्के तर पुण्यात ८२ टक्के असे राज्यात एकूण ८७ टक्के प्रवेश निश्चित झाले आहेत.
अकरावी प्रवेशाची शेवटची फेरी संपली आहे. मात्र, अद्यापही अनेक विद्यार्थी प्रवेशाच्या चौकशीसाठी येत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी विशेष काही करता येईल का, याची विचारणा आम्ही करण्याचा प्रयत्न करीत आहोत. - शेषराव बडे, सहायक उपसंचालक मुंबई विभाग.