- धर्मराज हल्लाळेवृत्तसंपादकसरकार दरबारी मराठवाड्याच्या विकासावर सातत्याने चर्चा होत राहते. उद्योग, दळणवळण आणि कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीच्या फेऱ्यात अडकलेल्या कृषी क्षेत्राच्या विवंचना कायम आहेत. शिक्षणातही संशोधन, दर्जेदार शिक्षण देणाऱ्या राष्ट्रीय संस्थांची प्रतीक्षाच आहे. रोजगारनिर्मिती करू शकेल अशा दर्जाचे उच्च शिक्षण घेण्यासाठी अजूनही मुंबई, पुणे आणि दिल्लीसारख्या महानगरांकडे जावे लागते. परंतु, शालेय, उच्च माध्यमिक शिक्षणात मराठवाड्याने गुणवत्ता सिद्ध केली आहे. त्यातही राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेची तयारी, त्याचा निकाल आणि वैद्यकीय प्रवेशामध्ये मराठवाडा हे देशाचे केंद्र बनले आहे. आता राजस्थानमधील कोटा या शहरानंतरच नव्हे तर त्याआधी लातूर, नांदेडचे नाव वैद्यकीय प्रवेशपरीक्षांसाठी ठळकपणे घेतले जाऊ लागले आहे.
शुल्काशिवाय इतर खर्च दुप्पट; उलाढाल आणखी वाढणार...लातूर आणि नांदेड हे नीट, जेईईच्या तयारीचे मुख्य केंद्र बनले आहेे. लातूरमध्ये साधारणपणे ३० हजार विद्यार्थी वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेशपूर्व परीक्षांच्या तयारीसाठी येतात. अकरावी, बारावी आणि रिपिटर्स अशी एकत्रित संख्या आणि प्रत्येकी किमान ५० ते ७५ हजार रुपये शुल्क अशी गोळाबेरीज केली तर किमान दीडशे ते दोनशे कोटी रुपये शुल्क होते. त्यात प्रत्येक विद्यार्थ्यामागे वर्षभराचा निवास, भोजन आणि इतर खर्च असे प्रत्येकी दीड लाख याप्रमाणे साडेचारशे कोटींची उलाढाल होते. अशीच उलाढाल नांदेडमध्ये होत आहे. ज्यामुळे लातूर, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथे वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेशपूर्व परीक्षांच्या तयारीसाठी येणाऱ्या विद्यार्थी, पालकांच्या माध्यमातून किमान १,३०० कोटी वा त्यापेक्षा अधिकची उलाढाल होत आहे. एकंदर आर्थिक आलेखाइतकाच मराठवाड्याच्या गुणवत्तेचा आलेखही उंचावत आहे. त्यामुळे मराठवाडा, विदर्भातून मुंबई, पुण्यात स्थायिक झालेले पालक नीट, जेईईसाठी मराठवाड्यात येत आहेत. लातूर-नांदेडमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी दिसत आहेत.
२०२३ मध्ये वैद्यकीय प्रवेशात मराठवाड्याचा टक्का किती?
महाराष्ट्रात वैद्यकीयच्या जागा सुमारे ११ हजार, त्यात गुणवत्तेनुसार १५ टक्के केंद्रीय कोटा आणि व्यवस्थापन कोट्याच्या जागा वगळल्या तर राज्यातील ७ हजार जागांचा ताळेबंद मांडता येईल. लातूरमधून बारावी बोर्डाची तसेच नीटच्या लातूर केंद्रावरून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमधून सुमारे १,३०० विद्यार्थी यंदा शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयात गुणवत्तेनुसार प्रवेशित झाले आहेत. जवळपास तितकीच प्रवेशित संख्या नांदेडचीही आहे.बारावी बाेर्ड परीक्षा आपल्या गावात मात्र तयारी लातूर-नांदेडमध्ये केलेल्यांची संख्या अधिक आहे. त्याचा आधार नीट परीक्षा कोणत्या केंद्रावरून दिली, तेथील संख्येद्वारे घेता येतो.राज्यातील प्रत्येक चार विद्यार्थ्यांमागे वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशित झालेला १ विद्यार्थी मराठवाड्यात येऊन नीटची तयारी केलेला आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.
नीट, जेईईच्या तयारीसाठी राज्यभरातून विद्यार्थी लातूर, नांदेडमध्ये येत आहेत. त्याचा मूलाधार शालेय शिक्षण आणि तेथील गुणवत्ता आहे.
दहावीचे निकाल पाहिले, तर १०० टक्के गुण मिळविलेल्या राज्यातील एकूण विद्यार्थ्यांमध्ये ७५ टक्के विद्यार्थी लातूर विभागातील राहिले आहेत. २०२३ मध्ये राज्यातील १५१ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले. त्यात लातूरचे १०८ जण आणि छत्रपती संभाजीनगर विभागाचे २२ विद्यार्थी होते. म्हणजेच जवळपास ८५ टक्के विद्यार्थी मराठवाड्यातील होते.