लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशामध्ये आतापर्यंत केवळ १० ते १५ टक्के अभ्यासक्रमांना नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रिडिएशन (एनबीए) म्हणजेच राष्ट्रीय मूल्यांकन मंडळाची मान्यता मिळाल्याची माहिती या संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी दिली. हे प्रमाण भविष्यात वाढण्याची गरज आणि आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात प्रा. डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते, त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी देशातील शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, विद्यापीठांपैकी केवळ ३० ते ३५ टक्के संस्थांचे नॅक मूल्यांकन पूर्ण झाले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. नॅक अंतर्गत येणारी महाविद्यालये आणि विद्यापीठे यांचे मूल्यांकन आणि देशातील विविध शैक्षणिक संस्थांमधील अभ्यासक्रमांचे मूल्यांकन या दोन्ही भिन्न आणि स्वतंत्र यंत्रणा असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. वॉशिंग्टन अकॉर्ड या धोरणांतर्गत एनबीए संस्था येत असून, त्यानुसार ज्या अभ्यासक्रमांना एनबीए मूल्यांकन मिळाले आहे, ते अभ्यासक्रम इतर २५ देशांतील त्या अभ्यासक्रमांशी समकक्ष ठरतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना इतर देशांत जाऊन पुन्हा तोच अभ्यासक्रम न करता समकक्षता मिळाल्यामुळे पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळविणे शक्य होते. यामुळे अधिकाधिक अभ्यासक्रमांना एनबीए मान्यता प्राप्त होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
नॅक मूल्यांकन आवश्यकचशैक्षणिक संस्थेतील, विद्यापीठ किंवा महाविद्यालयातील शिक्षणाच्या दर्जावरच पदवीधराकडे काय कौशल्य असेल? त्याला नोकरी कशी आणि कुठे मिळेल हे अवलंबून असल्यामुळे नॅक मूल्यांकन आवश्यक आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थेचा ‘दर्जा’ आणि ‘गुणवत्ता’ ओळखण्यासाठी मूल्यांकन महत्त्वाचे असल्याचे मत सहस्त्रबुद्धे यांनी यावेळी मांडले. राज्य उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयाकडून केले जाणारे प्रयत्न चांगले असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.