लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बारावीच्या परीक्षा सुरू असतानाच उत्तरपत्रिका तपासणीवर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बहिष्कार टाकल्याने अंदाजे ३५ लाखांहून उत्तरपत्रिकांचे गठ्ठे विभागीय शिक्षण मंडळाच्या कार्यालयात पडून आहेत. नियामकांनीही हे गठ्ठे स्वीकारलेले नाहीत.
या परीक्षेला १४ लाख विद्यार्थी बसले आहेत. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासण्याचे काम लगेचच सुरू होणे अपेक्षित होते; मात्र परीक्षा सुरू होऊन पाच दिवस झाले तरी उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार कायम आहे.
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघासोबत झालेल्या शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीत त्यांच्या मागण्यांसंदर्भात अनुकूल भूमिका घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र बैठकीचे इतिवृत्त महासंघाला अद्याप प्राप्त झालेले नाही.
या पार्श्वभूमीवर इतिवृत्त मिळाल्यानंतरच महासंघाच्या कार्यकारिणीची बैठक होईल व आंदोलनाबाबतचा पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती महासंघाचे समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर यांनी दिली.
निकालावर परिणाम?शनिवारी झालेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठेही तपासणीसाठी गेले नाहीत. अंदाजे ३५ लाखांहून अधिक उत्तरपत्रिका पडून आहेत, असे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर यांनी सांगितले.
प्रक्रिया प्रलंबितचn पेपरनंतर संबंधित विषयांच्या मुख्य नियामकांची बैठक होते. नंतर विभागीय पातळीवर बैठक होते. यात तपासणीच्या प्रक्रियेचे नियोजन होते. n प्रत्येक नियामकाकडे सहा ते सात उत्तरपत्रिका तपासणीस असतात. त्यांना द्यावयाची प्रश्नपत्रिका व आदर्श उत्तरपत्रिका यांच्या वितरणाबाबत निश्चिती होते. त्यानंतर तपासणीची प्रक्रिया सुरू होते. परंतु नियामकांची बैठकच झाली नसल्याने सर्व प्रक्रिया प्रलंबित आहे.