लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अभियांत्रिकीसाठी यंदा राज्यातील ३२९ महाविद्यालयात १ लाख ३० हजार ५४३ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी ८९ हजारांहून अधिक जागांवर प्रवेशनिश्चिती झाली आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत अभियांत्रिकीच्या रिक्त जागांत घट झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२०- २१च्या तुलनेत यंदा प्रवेशाच्या जागांमध्ये ७ ते ८ टक्क्यांनी वाढ झाली. उपलब्ध जागांपैकी जवळपास ३९ टक्के जागा रिक्त आहेत. ही संख्या मागील वर्षीच्या तुलनेत कमी असून गेल्या वर्षी जवळपास ५० टक्के जागा रिक्त होत्या.
गेल्या काही वर्षांमध्ये अभियांत्रिकीच्या प्रवेशाच्या जागा मोठ्या प्रमाणावर वाढल्या. परंतु, विद्यार्थ्यांची संख्या घटत असल्याने अनेक महाविद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर होती. हे चित्र बदलत असून, अभियांत्रिकीच्या प्रवेशांमध्ये पुन्हा वाढ होत आहे.
पुण्यात सर्वाधिक प्रवेश अभियांत्रिकी प्रवेशामध्ये सर्वाधिक प्रवेश हे पुणे विभागात झाले आहेत. पुणे विभागात सर्व मिळून ५७,७७४ जागा होत्या. त्यापैकी ३७ हजार ३१४ प्रवेश झाले, मुंबई विभागात त्यापाठोपाठ प्रवेश झाले आहेत, २९ हजार ७४७ पैकी १८ हजार २१६ प्रवेश झाले, तर नागपूर विभागात १३ हजार ८३५ प्रवेश झाले, अशी माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने दिली आहे.
गेल्या वर्षांच्या तुलनेत अभियांत्रिकीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा १२ हजारांनी वाढली आहे. सीईटी सेलने अंतिम आकडेवारी जाहीर केली आहे. यावर्षी ८९ हजार २४ प्रवेश झाले आहेत, तर ५२ हजार २०९ जागा रिक्त आहेत. गेल्या वर्षी ६४ हजार ८८३ जागा रिक्त होत्या.
विद्यार्थ्यांच्या अडचणी विचारात घेऊन त्यांना मुदतवाढ देण्यात आली. प्रवेश वेळापत्रकात सुसूत्रता आणि लवचिकपणा ठेवल्यामुळे प्रवेशात वाढ झाली.- रवींद्र जगताप, सीईटी सेलचे आयुक्त