नवी दिल्ली : देशात प्रचंड स्पर्धा वाढल्यामुळे भारतीय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात विदेशात जाऊन एमबीबीएस करीत असले, तरी भारतात परत आल्यानंतर बंधनकारक असलेली फॉरेने मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन (एफएमजीई) नावाची टेस्ट त्यातील केवळ १५ टक्के विद्यार्थीच उत्तीर्ण होतात, अशी माहिती समोर आली आहे.
एफएमजीई टेस्ट पास झाल्याशिवाय या डॉक्टरांना भारतात वैद्यकीय व्यवसाय करता येत नाही. ही टेस्ट उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांत बांगलादेश, नेपाळ आणि मॉरिशसमधून एमबीबीएस झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. गंमत म्हणजे या तिन्ही देशांना विद्यार्थ्यांत फार कमी पसंती आहे.
एफएमजीई टेस्ट घेणाºया ‘नॅशनल बोर्ड आॅफ एक्झामिनेशन’ने केलेल्या विश्लेषणातून ही माहिती समोर आली आहे. २०१५ आणि २०१८ यादरम्यान विदेशात वैद्यकीय पदवी घेणाºया ६१,७०८ विद्यार्थ्यांचा अभ्यास बोर्डाने केला आहे. चीन, रशिया आणि युक्रेन येथून पदवी घेणारे सर्वांत कमी सरासरी १४.२ टक्के (८,७६४) विद्यार्थी एफएमजीई उत्तीर्ण होऊ शकले. विदेशात वैद्यकीय शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांपैकी ८७.६ टक्के (५४,०५५) विद्यार्थी चीन, रशिया, बांगलादेश, युक्रेन, नेपाळ, किर्गिस्तान आणि कझाकिस्तान या सात देशांतील महाविद्यालयांत प्रवेश घेतात. चीनमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ११.६७ टक्के (२०,३१४ पैकी २,३७०), रशियाचे १२.८९ टक्के आणि युक्रेनचे १५ टक्के आहे. प्राप्त माहितीनुसार, भारतीय विद्यार्थी सौदी अरेबिया, गयाना, केमन आयलँड्स, लिबिया आणि पाकिस्तान या देशांतही वैद्यकीय शिक्षणासाठी जातात.