मुंबई – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलोजीने प्रवेश प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. सरकारने २०२०-२१ मध्ये आयआयटीच्या नियमांमधील या बदलांना मान्यता दिली आहे. त्यामुळे आता आयआयटी प्रवेशासाठी १२ वीमध्ये ७५ टक्के गुण असावेत ही अट काढून टाकण्यात आली आहे. फक्त उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांनाही आयआयटीमध्ये प्रवेश घेता येणार आहे.
आआयटी प्रवेशातील नियमात बदल करण्याचा निर्णय संयुक्त प्रवेश बोर्ड, आयआयटीने घेतल्याची माहिती मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विटरद्वारे दिली. कोरोनामुळे अनेक बोर्डाच्या १२ वीच्या परीक्षा काही अंशी रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आयआयटीमध्ये जेईई अँडवान्स परीक्षा पास होण्याव्यतिरिक्त १२ वीत कमीत कमी ७५ टक्के गुण मिळणे गरजेचे होते किंवा पात्रता परीक्षेत २० टक्के निकष लावले जात होते. मात्र आता जेईई अँडवान्स २०२० परीक्षा पास झालेल्यांना प्रवेशासाठी सूट देण्यात आली आहे.
त्याचसोबत १२ वी कक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांनाही आयआयटीत प्रवेश घेता येईल, त्यासाठी त्यांना टक्केवारीची कोणतीही अट घालण्यात आली नाही. यापूर्वीच्या माहितीनुसार जेईई अँडवान्स परीक्षेतील अभ्यासक्रम कमी करणे आणि प्रवेश परीक्षा नियम बदलण्यावर चर्चा सुरु आहे. यावर्षी आयआयटी दिल्लीने जेईई अँडवान्स परीक्षेचे आयोजन केले होते.
सरकारच्या या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. बोर्डाच्या परीक्षा रद्द झाल्याने अनेक हुशाक विद्यार्थी नाराज झाले होते. बोर्डाच्या परीक्षेत चांगली कामगिरी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली असते. कोरोनामुळे जेईई परीक्षा अद्याप घेतल्या नाहीत पण १ ते ६ सप्टेंबर दरम्यान या परीक्षा प्रस्तावित आहेत.