मुंबई : यंदाची अकरावी प्रवेश प्रक्रिया संपल्याचे शिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत सुमारे चार लाख १९ हजार २३० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून अद्यापही १ लाख ६६ हजार ४२५ जागा रिक्त असल्याचे समजते. त्यामुळे राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रियेत प्रवेशाची टक्केवारी ही ८७.७३ टक्के असून रिक्त जागांची टक्केवारी २८ एवढी आहे. अकरावी प्रवेशासाठी अर्ज केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ५८ हजार ६४६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नाहीत. यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी आयटीआय, पॉलिटेक्निक अशा इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नागपूर, नाशिक, अमरावती महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत तीन नियमित फेऱ्या, तीन विशेष फेऱ्या आणि २६ सप्टेंबरपासून ते २१ऑक्टोबरपर्यंत दैनंदिन गुणवत्ता विशेष फेऱ्यांचे आयोजन केले होते, तरीही आणखी काही निवडक विद्यार्थी प्रवेशासाठी प्रतीक्षेत आहेत. मात्र शिक्षण संचालनालयाकडून आता प्रवेश प्रक्रिया संपली असल्याची माहिती देण्यात आली असून लवकरच यासंदर्भात कनिष्ठ महाविद्यालयांना सूचना देण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
मुंबईत प्रमाण अधिक अकरावी प्रवेशासाठी सर्व विभागात उपलब्ध असलेल्या एकूण जागांपैकी मुंबईत अकरावीचे ९० टक्के प्रवेश निश्चित झाले आहेत तर नागपूर विभागात सर्वाधिक जागा रिक्त राहिल्या असून रिक्त जागांचे प्रमाण ३७ टक्के आहे. अमरावती विभागात ८४ टक्के , नागपूर विभागात ८७ टक्के , नाशिक विभागात ७२ टक्के तर पुण्यात ८२ टक्के असे राज्यात एकूण ८७ टक्के प्रवेश निश्चित झाले आहेत. अमरावती विभागात रिक्त जागांचे प्रमाण ३४ टक्के आहे तर मुंबईत हे प्रमाण २६ टक्के आहे, नाशिक विभागात २९ टक्के रिक्त जागा असून पुण्यात हे प्रमाण २९ टक्के आहे. राज्यातील रिक्त जागांचे प्रमाण २९ टक्के आहे.