रेश्मा शिवडेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: एमएचटी-सीईटीच्या निकालातील गुणांच्या फुगवट्यामुळे यंदा राज्यातील इंजिनीअरिंग, फार्मसी व्यावसायिक अभ्यासक्रमांचा कटऑफ चांगलाच वधारणार आहे. या एकतर यंदा एमएचटी-सीईटीत ३७ विद्यार्थ्यांनी १०० पसेंटाईल मिळविण्याची कामगिरी केली आहे. गेल्या वर्षी हा आकडा २८ होता. केवळ १०० पर्सेटाईलच नव्हे, तर १० ते ९९.९९, ८० ते ८९.९९, ७० ते ७९.९९, ६० ते ६९.९९ अशा वरच्या श्रेणीत पर्सेटाईल मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही यंदा लक्षणीय वाढ झाली आहे. ही वाढ पीसीएम आणि पीसीबी या दोन्ही विषयगटांत आहे. त्यामुळे इंजिनीअरिंग, फार्मसी, कृषी या अभ्यासक्रमांचा प्रवेशाचा कटऑफ यंदा चांगलाच वधारणार आहे. वरच्या श्रेणीतील काही विद्यार्थ्यांनी केंद्रीय किंवा अन्य शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा गुणांचा फुगवटा इतका जास्त आहे की, कटऑफ वधारलेला राहील. यंदा पीसीबीच्या २,९५,५७७ आणि पीसीएमच्या ३,७९,८०० अशा एकूण ६,७५,३७७ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांच्या संख्येत लाखभर तरी वाढ झाली आहे. त्यात निकाल फुगल्यामुळे ठरावीक विषयांमध्ये प्रवेशासाठी मोठी चढाओढ पाहायला मिळेल. इंजिनीअरिंगच्या काही प्राचार्यांच्या मते मात्र वरच्या पर्सेटाईलमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने प्रवेशाच्या कट-ऑफवर फारसा परिणाम होणार नाही. कारण, कॉम्प्युटर सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटी यांसारख्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश क्षमतेत झालेली मोठी वाढ. दुसरे म्हणजे प्लेसमेंटचे निराशाजनक रिपोर्ट. यामुळेही विद्यार्थी प्रत्यक्षात व्यावसायिक अभ्यासक्रमांना कितपत पसंती देतील, याबाबत प्राचार्य साशंक आहेत.
उद्योग क्षेत्राच्या बदललेल्या गरजा पाहता काही जुन्या शाखांना महत्त्व येऊ शकते. उदाहरणार्थ, सेमी-कंडक्टर आणि चिप मेकिंग क्षेत्राची गरज पाहता व्हीएलएसआय डिझाईन तंत्रज्ञानाबरोबरच विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक्स या इंजिनीअरिंगच्या पारंपरिक शाखेला पसंती देण्याची शक्यता आहे. थोडक्यात, अशाही शाखांचा कटऑफ वाढू शकतो.
- सुरेश उकरंडे, प्राचार्य, के. जे. सोमय्या कॉलेज