भारत, २८ सप्टेंबर २०२३ : डेक्कन एज्युकेशन सोसायटीने (डीईएस) २७ डिसेंबर २०२३ रोजी महत्त्वाच्या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेसाठी शिक्षणक्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे युनिव्हर्सिटी (डीईएसपीयू) संस्थापक कुलगुरू प्रा. प्रसाद डी. खांडेकर, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन व डीईएसपीयूचे प्रेसिडेंट डॉ. शरद कुंटे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्री. धनंजय कुलकर्णी, शिक्षणतज्ज्ञ व डीईएसचे आजीव सदस्य डॉ. प्रसन्न देशपांडे आणि डॉ. आशीष पुराणिक यांचा यात समावेश होता.
फर्ग्युसन महाविद्यालयातील अध्यापक डॉ. प्रसन्न देशपांडे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सन्माननीय चेअरमन डॉ. शरद कुंटे यांचा परिचय करून देत डॉ. देशपांडे यांनी या कार्यक्रमाची सुरुवात केली. डॉ. कुंटे यांनी या परिषदेचे औपचारिक उद्घाटन केले. डॉ. कुंटे यांनी अत्यंत अभिमानाने डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे युनिव्हर्सिटीच्या स्थापनेची घोषणा केली. ही संस्था म्हणजे डीईएसच्या वैभवशाली वारशाचे द्योतक असून त्यांचे मुख्य कार्यालय पुण्यात आहे. सर्वसमावेशक शिक्षण व सामाजिक प्रगतीमध्ये झेप घेतलेल्या डीईएसला डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे युनिव्हर्सिटी (डीईएसपीयू) या ताज्या शैक्षणिक उपक्रमाचे अनावरण करताना अत्यंत आनंद होत आहे. या युनिव्हर्सिटीमध्ये पाच विद्यालये असतील. यात वाणिज्य व व्यवस्थापन, विज्ञान व गणित, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, मानवविज्ञान व समाजशास्त्र आणि डिझाइन व कला या शाखांचा समावेश असून एकूण २१ अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
उपस्थितांसमोर मनोगत व्यक्त करताना डीईएसचे चेअरमन व डीईएसपीयूचे प्रेसिडेंट डॉ. शरद कुंटे म्हणाले, "शिक्षण स्वतंत्र आहे आणि शिक्षणातून स्वातंत्र्यप्राप्ती होते हे लोकमान्य टिळकांचे वचन डीईएसपीयूसाठी मार्गदर्शक तत्व आहे. खऱ्या शिक्षणाच्या शोधात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी डीईएसपीयू ही कर्मभूमी असेल. या ठिकाणी हे विद्यार्थी स्वतंत्र नेतृत्व म्हणून उदयास येतील आणि जगामध्ये सकारात्मक बदल घडवतील."
ते पुढे म्हणाले, "डीईएसतर्फे शिक्षणाला कायम प्राधान्य देण्यात येते. गुणवत्तापूर्ण ज्ञानदानावर व ज्ञाननिर्मितीवर त्यांच्यातर्फे भर देण्यात येतो. याला डीईएसपीयूच्या अत्याधुनिक पायाभूत सुविधांचे पाठबळ लाभले आहे. त्यामुळे विविध शैक्षणिक शाखांमधील उच्चशिक्षण घेणे येथे शक्य होऊ शकते." महाविद्यालयांचे जाळे स्थापन करण्याच्या या संस्थेच्या भविष्याबद्दल झलक देऊन डॉ. कुंटे यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
पुढे, या परिषदेत डीईएसपीयूचे संस्थापक कुलगुरू प्रा. प्रसाद डी. खांडेकर यांनी ज्ञानाची व शिक्षणाची कास धरण्यासंदर्भात या संस्थेतर्फे करण्यात येणाऱ्या अविरत प्रयत्नांवर भर दिला. "ज्ञानाचा शोध घेत राहणे हे डीईएसपीयूमध्ये आमचे मिशन आहे. आम्ही बहुशाखीय दृष्टिकोनाला चालना देतो. या दृष्टिकोनात मूल्यांना सर्वात जास्त महत्त्व दिले जाते, त्याचप्रमाणे शिक्षण सर्वांना उपलब्ध व्हावे याची तरतूद करण्यात येते. डीईएसपीयूचा प्रकृतीधर्म व मूल्ये डीईएसचा प्रकृतीधर्म व मूल्ये प्रतिबिंबित करतात, हे उल्लेखनीय आहे. आम्ही एक खासगी संस्था आहोत. आमच्यावर लोकांचा विश्वास आहे आणि अत्यंत समर्पणभावनेने आम्ही या संस्थेचे व्यवस्थापन करतो.", असे प्रा. खांडेकर म्हणाले. सर्व भागधारकांमध्ये ज्ञानप्रसार करण्यासाठी तीन संशोधन केंद्रे स्थापन करण्याची योजना त्यांना येथे उलगडून सांगितली.
प्रा. खांडेकरांच्या भावनेला दुजोरा देत डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्री. धनंजय कुलकर्णी म्हणाले, "डीईएसपीयूमध्ये आमचा प्रकृतीबंध व मूल्ये राखण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येईल. त्यामुळे भक्कम पाया घातला जाईल. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल, परिणामी चांगले जग घडविण्यात योगदान दिले जाईल, अशी संस्था उभारणे ही डीईएसपीयूची आकांक्षा आहे."
डीईएसच्या बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्सचे सहायक प्राध्यापक डॉ. आशीष कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानत या कार्यक्रमाची सांगता झाली. "डीईएस आपल्या महत्त्वाच्या प्रवासाची सुरुवात करत असताना या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला शुभेच्छा व पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. आमचे शिक्षक, विद्यार्थी व सर्व भागधारकांचे मनापासून आभार मानतो.", अशी पुष्टी डॉ. पुराणिक यांनी जोडली.
या संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया https://despu.edu.in/ या वेबसाइटला भेट द्यावी