लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आरोग्य क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मेडिकल कॉलेजची गुणवत्ता सुधारावी, यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (एनएमसी) आता थेट राज्यातील सर्व मेडिकल कॉलेजेसवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून वॉच ठेवणार आहे. यात कॉलेजेसमधील सर्व शिक्षकांची उपस्थिती त्यांच्या आधार कार्डशी जोडणी असलेल्या बायोमेट्रिक्सनेच करावी, अशा सूचना आयोगाने दिल्या. सर्व कॉलेजचे सीसीटीव्ही फीड आणि उपस्थितीची माहिती थेट आयोगातील कार्यालयाशी जोडावी, असेही आयोगाने सांगितले आहे. त्यामुळे आयोगाची थेट नजर कॉलेजेसमधील सर्व शिक्षकांवर राहणार आहे.
राज्यात सध्या एमबीबीएसचे शिक्षण देणारी ६२ मेडिकल कॉलेजेस आहेत. त्यामध्ये १०,०४५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये सरकार आणि महापालिकेची २७, खासगी २०, अभिमत विद्यापीठाची १२, तर केंद्र सरकारच्या अखत्यारितील तीन मेडिकल कॉलेजेसचा समावेश आहे.
नव्या नियमांमुळे बसणार चापनव्या कॉलेजची परवानगी मिळताच आयोगाचे पथक तेथे तपासणीसाठी जाते. शिक्षकवर्ग आहे की नाही, याचीही तपासणी होते. सरकारच्या अखत्यारितील एखादे नवीन कॉलेजेस येत असेल, तर ते तपासणीपुरता त्यांच्या इतर कॉलेजेसमधील शिक्षकवर्ग काही दिवसांसाठी नवीन कॉलेजची तपासणी होईपर्यंत घेत असे. त्यामुळे नवीन कॉलेजमधील पदे भरण्यास मोठा कालावधी जातो. हीच स्थिती खासगी आणि अभिमत विद्यापीठाच्या कॉलेजेसमध्येही आहे. आता नवीन नियमांमुळे शिक्षकांच्या ‘पळवापळवीवर’ अंकुश येईल.
सर्व कॉलेजेसना पत्रराज्यातील सर्व मेडिकल कॉलेजेसना आयोगाने सूचनांचे पत्र सोमवारी पाठविले आहे. त्याचे पालन ऑगस्टमध्ये करणे बंधनकारक आहे.
आमच्याकडे काही पदे रिक्त आहेतच, हे मी नाकारत नाही; तसेच तपासणीवेळी एका कॉलेजचा शिक्षक वर्ग दुसऱ्या नवीन उघडणाऱ्या कॉलेजेसमध्ये दाखविला तर त्याला आम्ही तेथेच ठेवतो. त्यानंतर जी काही पदे रिक्त आहेत त्याची भरती करण्यात येते. - डॉ. दिलीप म्हैसेकर, संचालक, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, महाराष्ट्र राज्य