नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची ईयत्ता १२ वीची परीक्षा बुधवार २१ फेब्रुवारीपासून सुरू हाेत आहे. विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाचा सामना करावा लागणार आहे. नागपूर विभागात १ लाख ६३ हजार १७ विद्यार्थी व नागपूर जिल्ह्यातून ६६ हजार ४४५ विद्यार्थी यंदा परीक्षा देणार आहेत. विभागाने काॅपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी यावेळी ३६ भरारी पथके तयार ठेवली आहेत.
इंग्रजी विषयाने परीक्षा सुरू हाेत असून नागपूर विभागाच्या ६ जिल्ह्यात ४९८ केंद्रावर केंद्र संचालकांच्या निरीक्षणात बारावीची परीक्षा हाेत आहे. या केंद्रांवर ८४ पर्यवेक्षकांची नजर राहणार आहे. नागपूर शहरात ८ पथकांसह विभागासाठी ३६ भरारी पथके सज्ज करण्यात आली आहेत. याशिवाय प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांचेही पथक आकस्मिक निरीक्षणासाठी तयार राहणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे विभागीय संचालक चिंतामण वंजारी यांनी दिली. याबाबत मंगळवारी राज्यातील अधिकारी तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
विभागातील १.६३ लाख विद्यार्थ्यांपैकी ८३,७६४ मुले आणि ७९,२५२ मुलींचा समावेश आहे. यंदा वर्धा जिल्ह्यातून एकमेव तृतीयपंथी विद्यार्थी परीक्षेला बसणार आहे. पेपर तपासण्यासाठी १०,५२५ सुपरव्हाईजर कार्य करणार आहेत.
प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थी
जिल्हा एकूण मुले मुली केंद्रनागपूर ६६४५४ ३३९७० ३२४७५ १६८भंडारा १८०२४ ९३६२ ८६६२ ६४गाेंदिया १९९२४ १०३३४ ९६४४ ७६चंद्रपूर २८७३३ १४६४२ १४१७७ ८६वर्धा १६८८६ ८८७४ ८०११ ५४गडचिराेली १२८६५ ६५८२ ६२८३ ५०
शाखानिहाय विद्यार्थीविज्ञान ८६,७११कला ५२,४९३वाणिज्य १८,०७३एमसीव्हीसी ५१३४आयटीआय ६०६
शेवटी १० मिनिटे अधिकचीपूर्वी पेपर सुरू हाेण्यापूर्वी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका देण्यात येत हाेते. मात्र काॅपी किंवा माेबाईलद्वारे गैरप्रकार हाेण्याची शक्यता लक्षात घेत विद्यार्थ्यांना पेपर संपल्यानंतर १० मिनिटे अधिकची दिली जातील. पहिल्या सत्रात ११ वाजता सुरू झालेला पेपर २ वाजता संपेल व त्यानंतर २.१० वाजता पेपर घेतला जाईल. दुसऱ्या सत्रात ३ वाजता सुरू हाेणारा पेपर सुटल्यानंतर १० मिनिटे अतिरिक्त दिली जातील. विद्यार्थ्यांना मात्र अर्धा तास आधी केंद्रावर हजर राहावे लागेल. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी रस्त्यांची परिस्थिती लक्षात घेत तासभर अगाेदर घरून निघावे, असे आवाहन केले जात आहे.