मुंबई : अकरावी प्रवेशाच्या आठव्या फेरीच्या प्रस्तावावर अद्याप काहीही निर्णय झाला नसताना प्रवेशासाठी मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांनी विद्यार्थ्यांना आणखी एक संधी दिली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना १७ तारखेपर्यंत कार्यालयीन वेळेत कागदपत्रांसह उपस्थित राहायचे आहे. जुलैच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण होऊनही अकरावी प्रवेशाच्या पोर्टलवर नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी, यासाठी उपसंचालक कार्यालयाकडून ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
यंदा गतवर्षीच्या तुलनेत अकरावीची प्रवेश प्रक्रिया आठ दिवस उशिरा सुरू झाली. १ आॅक्टोबरपर्यंत ती सुरू होती. या काळात तीन नियमित, एक विशेष आणि तीन प्रथम प्राधान्य फेऱ्या अशा सात फेºया पूर्ण झाल्या आहेत. आता अकरावीच्या ऐन परीक्षेच्या काळात आठव्या प्रवेश फेरीचा प्रस्ताव शिक्षण उपसंचालक कार्यालयाने शालेय शिक्षण विभागाला दिला, मात्र त्यासंदर्भातील निर्णय होऊ शकला नाही. पूर्ण झालेल्या सात फेऱ्यांत यंदा अकरावी आॅनलाइनमधून किती विद्यार्थ्यांना प्रवेश दिले याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाने जाहीर केलेली नाही.
यंदा मुंबई विभागात अकरावी प्रवेशासाठी तीन लाखांहून अधिक जागा होत्या. त्यापैकी ९० हजार ते एक लाख जागा रिक्त राहिल्याची प्राथमिक आकडेवारी आहे. पुरवणी परीक्षा झालेल्या विद्यार्थ्यांना सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात संधी देण्यात आली. त्यानंतर अजूनही विद्यार्थी प्रवेशासाठी येत असल्याने ही प्रक्रिया उपसंचालक कार्यालयाकडून राबविण्यात येत आहे.
विद्यार्थी चिंतितअकरावीच्या अभ्यासक्रमाला सुरुवात होऊन महाविद्यालयांत पहिल्या सत्राची परीक्षा सुरू झाली आहे. तरीही प्रवेश न मिळाल्याने अनेक विद्यार्थी चिंतित आहेत. दुसरीकडे परीक्षा सुरू झाल्याने पुढील प्रवेश प्रक्रिया राबविण्यास महाविद्यालयांचा विरोध होत आहे. आता प्रवेश दिल्यास या विद्यार्थ्यांचा अभ्यास कोण पूर्ण करणार, असा प्रश्न महाविद्यालय प्रशासन उपस्थित करत आहे. पहिल्या सत्राच्या परीक्षा सुरू असून दिवाळीची सुट्टी तोंडावर आहे. त्यातच निवडणुका असल्याने कर्मचारी व पुरेसे प्राध्यापकही महाविद्यालय प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचे चित्र आहे.