मुंबई :
कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर टांगती तलवार असताना, राज्यातील तब्बल ५०९ शाळांना टाळे लागल्याचे वास्तव समोर आले आहे. राज्यात शैक्षणिक वर्ष २०२०-२१ वर्षात राज्यात १ लाख १० हजार ११४ शाळा अस्तित्वात होत्या. मात्र, २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात त्यामधील विविध व्यवस्थापनांच्या ५०९ शाळा बंद झाल्या आहेत. शाळा बंद झाल्यामुळे शिक्षक संख्येतही १५ हजारांहून अधिकची घट झाली आहे, तर मागील वर्षीपेक्षा यंदाच्या विद्यार्थी प्रवेशांत मात्र ७४ हजार ८५६ विद्यार्थ्यांची वाढ झालेली आहे.
राज्यात सध्या कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याची काय स्थिती आहे, याची माहिती शिक्षण विभागाकडून शासनाने मागविल्यानंतर असंतोष निर्माण झाला आहे. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर न करण्याची मागणी शिक्षण क्षेत्रातून केली जात आहे.
मराठी अभ्यास केंद्राकडून मराठी शाळांसाठी बृहत आराखडा सादर करून, ग्रामीण आणि आवश्यकता असलेल्या भागात २,५०० शाळांची आवश्यकता असल्याचे निवेदन शासनास सादर करून, त्याला मान्यता मागितली होती. मात्र, २०१७ साली तो रद्द करण्यात आल्याने जिथे आवश्यकता होती, तेथील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले. विद्यार्थी संख्या वाढत असताना, शाळांची संख्या घटल्यास ते हानिकारक असेल. - सुशील शेजुळे, समन्वयक, मराठी शाळा संस्थाचालक संघ
शाळा, विद्यार्थी व शिक्षक संख्यावर्ष २०२०-२१ २०२१-२२राज्यातील शाळा १,१०,११४ १,०९,६०५ शिक्षक संख्या ७,६६,९१६ ७,४८,५८९ विद्यार्थी संख्या २,२५,११,८३९ २,२५,८६,६९५