लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : शिक्षण मंत्रालयाने शालेय शिक्षणासाठी नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (एनसीएफ) तयार केला असून त्याअंतर्गत आता बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातील व विद्यार्थ्यांना त्यांचे सर्वोत्तम गुण टिकवून ठेवण्याचा पर्याय असेल. विद्यार्थ्यांना अकरावी, बारावीत विषय निवडीचे स्वातंत्र्य असेल. नवीन अभ्यासक्रम आराखड्यानुसार ११वी व १२वीच्या विद्यार्थ्यांना दोन भाषांचा अभ्यास करावा लागेल आणि यापैकी किमान एक भाषा भारतीय असावी.
‘इस्रो’चे माजी प्रमुख के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने बनविलेल्या एनसीएफमध्ये म्हटले की, शाळा मंडळे योग्यवेळी मागणीनुसार परीक्षा घेण्याची क्षमता विकसित करतील. मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नवीन शैक्षणिक धोरणानुसार (एनईपी) नवीन अभ्यासक्रम आराखडा तयार आहे आणि त्यावर आधारित, २०२४ च्या शैक्षणिक सत्रासाठी पाठ्यपुस्तके तयार केली जातील.
महत्त्वाचे काय?
- दीर्घकाळासाठी सर्व मंडळांनी सेमिस्टर किंवा नियतकालिक पद्धतीचा अवलंब करावा.
- एकूण प्रमाणीकरणात कामगिरीवर आधारित मूल्यांकनावर ७५ टक्के आणि लेखी परीक्षेवर २५ टक्के भर द्यावा.
- विज्ञान आणि इतर विषयांचे मूल्यमापन कामगिरीवर आधारित म्हणजेच प्रयोगाशी जोडलेले असावे. विषयाच्या प्रमाणीकरणात त्याला २०-२५ टक्के महत्त्व असायला हवे.