उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं, तर अनेकदा कर्ज हा पर्याय निवडावा लागतो. हा निर्णय घेताना पालक आणि विद्यार्थ्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात- १ - व्याजाचा दर : भारतात शैक्षणिक कर्जही स्वस्त नाही. शैक्षणिक कर्ज बुडीत खात्यात जाण्याचं प्रमाण जास्त असल्यानं या व्याजाचा दरही जास्त असतो. विद्यार्थी शिकत असतानाच व्याज भरले असेल आणि त्यानंतर नियमितपणे कर्जाची परतफेड केली असेल, तर बँका व्याज एक टक्क्याने कमी करतात. याचा फायदा घ्यायला हवा.२ - शिक्षणसंस्था : निवडलेली शिक्षण संस्था नामांकित असेल, तर बँकाही कर्ज देण्यासाठी पुढे येतात. अशा संस्थेत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी व्याजाचा दरही कमी असतो. कारण, भविष्यात त्यांना चांगला रोजगार मिळण्याची बऱ्यापैकी खात्री असते. ३ - तारण किंवा गहाण : सार्वजनिक क्षेत्रातील बँका साधारणपणे ७.५ लाख रुपयांपेक्षा जास्त कर्जासाठी तारणाचा आग्रह धरतात. अनेक वित्तीय संस्था तारणाशिवाय कर्ज देत असल्या, तरी व्याजाचा खर्च कमी करण्यासाठी तारण ठेवण्याचा पर्यायही चांगला ठरू शकतो.४ - सह-कर्जदार : बहुतेक वित्तीय संस्था सह-कर्जदार म्हणून पालकांचा आग्रह धरतात. पालक जर निवृत्त झाले असले किंवा निवृत्तीजवळ आले असले तर बँक त्यांना गॅरेंटर म्हणून विचारात घेत नाही. अशावेळी अधिक व्याजदराने कर्ज घ्यावे लागते.५ - मार्जिन मनी : एकूण खर्चात तुमचे योगदान मार्जिन मनी म्हणून ओळखले जाते. काही बँका मार्जिन मनी शिवायही कर्ज देतात, पण त्यांचा व्याजाचा दर अधिक असतो.६ - मोरॅटोरिअम किंवा अधिस्थगन : शैक्षणिक कर्जांची परतफेड विद्यार्थ्याचे शिक्षण संपल्यानंतर वर्षभराच्या आत सुरू होत असली, तरी दरम्यानच्या काळात व्याज फेडलेले असेल, तर फक्त मुद्दलावरच व्याज द्यावे लागते.७ - कर्जाचा कालावधी : जास्तीत जास्त कालावधीसाठी शैक्षणिक कर्ज घेणे परवडते. कारण इएमआय कमी असल्याने पगार कमी असला, तरी दडपण येत नाही. शिवाय कर्ज लवकर फेडले तरी त्यावर तु्म्हाला पेनल्टी लागत नाही.८ - स्कॉलरशिप : शैक्षणिक कर्ज हा उत्तम पर्याय असला, तरी तोच एकमेव नाही. गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही मिळते. ती मिळत असल्यास कर्जाचा भार कमी होऊ शकतो.
शिक्षणासाठी कर्ज घेताय? - आधी हे वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 9:34 AM