दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्प मांडला जातो. विविध क्षेत्रासाठी निधीची तरतूद केली जाते, मात्र हि तरतूद सर्व सामान्यांपर्यंत पोहोचते का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर शिक्षण तर दुसरीकडे उच्चशिक्षण घेऊनही बेकार होण्याची वेळ आल्याने अर्थसंकल्पात दिलासा मिळावा अशी अपेक्षा तरूणांकडून व्यक्त केली जात आहे.
अर्थसंकल्पात सामान्य माणसाला नेमका काय दिलासा मिळतो. ते अजूनही स्पष्ट झालेले नाही. महाग होत असलेले शिक्षण तर दुसरीकडे उच्चशिक्षण घेऊनही बेकार होण्याची आलेली वेळ याकडे सरकारने गंभीरपणे पाहायला हवे. बाल आणि महिला कल्याण युवक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ठोस अशा योजनेची आवश्यकता आहे.- संतोष यमगर
शिक्षणाविषयी प्रचंड जागृती निर्माण झाली असताना पैशाअभावी लोक मुलाला शिकवू शकत नाहीत. आंतरराष्ट्रीय शाळांचे नवे फॅड देशभर बोकाळले आहे. तेथे लाख-लाख रुपयाची फी वसूल केली जात असते. तर महाविद्यालय स्तरावर कितीही गुणवंत विद्यार्थी असला तरी डॉक्टर होण्याकरिता त्याला किमान पाच ते दहा लाख रुपये खर्च करावे लागतात. ही परिस्थिती बदलण्याची आवश्यकता आहे. - अंकुश म्हात्रे.
शिक्षणाचा राजरोस चाललेला पैसे उकळण्याचा धंदा नियंत्रणात आणला पाहिजे. यातून अतिशय गरीब किंवा सामान्य वर्गातील लोकांना मुलांना शिक्षण देणे सुलभ होऊ शकेल. सरकारने आयुष्यमान नावाची वैद्यकीय खर्च उचलणारी योजना जाहीर केली. परंतु ती सामान्य माणसापर्यंत अजूनही पोहचलेली नाही. - मंगला गजने.
इच्छा असूनही मनासारखे शिक्षण घेता येत नाही. शिक्षण घेऊनही योग्य ते रोजगार मिळत नाही आणि रोजगार मिळाला तरी स्वतःचे आरोग्य टिकवण्याकरिता योग्य ती व्यवस्था उपलब्ध नाही. असे हे विचित्र चक्रव्यूह असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे या पायाभूत सुविधांचा विचार व्हावा. - रिया पड्यार.
केंद्रीय अर्थसंकल्पातून सामान्य माणसाला त्यातही शिक्षण, आरोग्य, यासारख्या क्षेत्राला दिलासा देणाऱ्या योजनांना पाठबळ मिळावे लागेल. अर्थसंकल्पाचा नुसताच गाजावाजा होत असतो. परंतु प्रत्यक्षात अर्थसंकल्पातला हा पैसा सामान्य माणसापर्यंत धडपणाने पोहचत नाही ही आज वस्तुस्थिती आहे - कैलास गजने.