मुंबई - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (सीबीएसई) फेब्रुवारी-मार्च, २०२४मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल ९३.६० टक्के इतका लागला आहे. देशभरातून २५,७२४ शाळांमधून २२ लाख ३८ हजार८२७ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी २० लाख ९५ हजार ४६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्तीर्णततेत ०.४८ टक्के इतकी वाढ झाली आहे.
मुलींचा निकाल मुलांच्या तुलनेत अधिक म्हणजे ९४.७५ टक्के तर मुलांचा ९२.७१ टक्के इतका लागला आहे. महाराष्ट्राचा समावेश असलेल्या पुणे विभागाचा निकाल ९६.४६ टक्के इतका लागला आहे.
नवोद्य, केंद्रीय विद्यालयांचा निकाल सर्वाधिकनवोद्य आणि केंद्रीय विद्यालयांचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९९.०९ टक्के लागला आहे. तर खासगी शाळांचा निकाल ९४.५४ टक्के इतका आहे. तसेच सरकारी व अनुदानित शाळांचा निकाल अनुक्रमे ८६.७२ आणि ८३.९५ टक्के लागला आहे. सेंट्रल तिबेटियन स्कुलचा निकाल ९४.४० टक्के लागला आहे.
९ टक्के विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुणदेशभरात २,१२,३८४ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. हे प्रमाण ९.४९ टक्के इतके आहे. तर ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविणारे ४७,९८३ विद्यार्थी असून त्यांचे प्रमाण २.१४ टक्के इतके आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढलीसीबीएसईच्या बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली असली तरी दहावीच्या विद्यार्थ्यांची वाढलेली दिसून येते. गेल्या वर्षी दहावीला नोंदणी केलेल्या २१,८४,११७ विद्यार्थ्यांपैकी २१,६५,८०५ विद्यार्थी परीक्षेच्या बसले होते. यंदा हे प्रमाण अनुक्रमे २२,५१,८१२ आणि २२,३८,८२७ वर गेले आहे.
लडाख, त्रिपुरामध्ये प्रथमच परीक्षायंदा सीबीएसईने प्रथमच लडाखमधील १५५ सरकारी शाळांमध्ये (११६ दहावीच्या, ३९ बारावीच्या) दहावी-बारावीची परीक्षा घेतली होती. दोन्ही मिळून ७५ केंद्रांवर या परीक्षा घेण्यात आल्या. तर त्रिपुरात १२४ विद्या ज्योती शाळांमध्ये परीक्षा घेण्यात आली.