CBSE, ICSE Class 12 Exams: सीबीएसई (CBSE) म्हणजेचं केंद्रीय माध्यमिक परीक्षा बोर्डाच्या आणि आयसीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भातील याचिकेवरील सुनावणी आज सुप्रीम कोर्टात झाली. आज खरंतर सुप्रीम कोर्टाकडून अंतिम निर्णय येणं अपेक्षित होतं. पण अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनी केंद्र सरकार दोन दिवसांमध्ये अंतिम निर्णय घेईल असं कोर्टाला सांगितलं. त्यामुळे दोन दिवसांचा वेळ देण्याची विनंती केली. सुप्रीम कोर्टानं ही विनंती मान्य करत याचिकेवरील सुनावणी गुरुवारपर्यंत पुढे ढकलली आहे.
बारावी परीक्षेला पर्याय काय? राज्य सरकार विचारात, विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रम
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई, आयसीएसई बोर्ड परीक्षा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका अॅड. ममता शर्मा यांनी केली होती. न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठासमोर आता गुरुवारी सुनावणी होईल.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या, तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. बारावीच्या परीक्षा रद्द करणे शक्य नसल्यामुळे त्या कोणत्या पद्धतीने घ्याव्यात याबाबत विविध पर्यायांचा विचार केला जात आहे. मात्र, परीक्षा लांबल्यामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकार नेमका कोणता निर्णय घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.