लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्य शिक्षण मंडळात सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्याच्या निर्णयावर होणाऱ्या टीकेला शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानसभा आणि विधानपरिषदेत सोमवारी एका निवेदनाद्वारे उत्तर दिले. सीबीएसईचा अभ्यासक्रम हा राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध करून देईल. या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना जेईई, नीट, यूपीएससीसारख्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांसाठी अधिक चांगली तयारी करता येईल, असे भुसे यांनी विधानसभेत सांगितले.
नवीन अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना मूलभूत संकल्पना स्पष्ट होणार असून, त्यांना जीवनोपयोगी शिक्षण मिळणार आहे. संकल्पनांच्या समजुतीवर अधिक लक्ष दिले जाते, त्यामुळे विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळते. प्रकल्प, उपक्रम आणि इतर मूल्यांकन तंत्रांचा समावेश आहे. अभ्यासक्रम लागू करण्याच्या निर्णयावर अनेक स्तरातून टीका होऊ लागल्यानंतर याबाबत शिक्षण विभागाची भूमिका मांडण्याासाठी दादा भुसे यांनी विधानसभा आणि विधानपरिषदेत याबाबत सविस्तर निवेदन केले.
सीबीएसई अभ्यासक्रम कधीपासून अमलात येणार?
- २०२५ - इयत्ता १ली
- २०२६ - २री, ३री, ४थी, ६वी
- २०२७ - ५वी, ७वी, ९वी, ११वी
- २०२८ - ८वी, १०वी, १२वी
विद्यार्थी विकासाच्या दृष्टीने अभ्यासक्रमात काय?
- सीबीएसई अभ्यासक्रमात आपली संस्कृती व परंपरांना प्राधान्य देण्यात आले आहे. महाराष्ट्रातील संत, समाजसुधारक आणि ऐतिहासिक व्यक्तींना नवीन अभ्यासक्रमात अधिक महत्त्व दिले जाईल.
- अभ्यासक्रमात घोकंपट्टीवर आधारित परीक्षा पद्धतीऐवजी सतत आणि सर्वंकष मूल्यमापन पद्धत लागू केली जाईल. शिक्षकांसाठी नवीन प्रशिक्षण प्रणाली लागू केली जाईल, ज्यामध्ये तंत्रज्ञानाचा अधिक समावेश असेल, असेही भुसे यांनी सांगितले.
- महाराष्ट्र राज्य मंडळाच्या (एसएससी) अभ्यासक्रमात बदल करून त्याला अधिक व्यावहारिक आणि समजण्यास सोपे करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. बालभारतीने तयार केलेली नवीन पाठ्यपुस्तके राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी)च्या शिफारशींवर आधारित असतील.
- सॉफ्ट स्किल्स आणि समुपदेशनावर भर, विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक विकासावर लक्ष दिले जाते. संवाद कौशल्ये, नेतृत्वगुण, तणाव व्यवस्थापन शिकवले जाते. विद्यार्थ्यांच्या सततच्या प्रगतीवर लक्ष ठेवणे, आदी बाबींवर भर दिला आहे.