लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) शाळांसाठी बारावीचा निकाल तयार करण्याची मुदत २५ जुलैपर्यंत वाढविली आहे, असे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी बुधवारी सांगितले. आधी ही मुदत २२ जुलै होती.
निकाल तयार करण्याची अंतिम तारीख जवळ येत असल्याने या प्रक्रियेत सहभागी असलेले शिक्षक तणावाखाली असून धास्तावले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून चुका होत आहेत. या चुका दुरुस्त करण्यासाठी शिक्षक सीबीएसईला विनंती करीत आहेत.
समस्यांची सीबीएसईला जाणीव आहे. त्या पार्श्वभूमीवर सीबीएसईने अंतिम तारीख वाढवून २५ जुलै करण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ जुलै रोजी निकाल घोषित केला जाणार आहे. तथापि, निकाल तयार करण्यासाठी शाळांना मुदतवाढ देण्यात आल्याने निकाल घोषित करण्यात उशीर होईल का? याबाबत सीबीएसईने स्पष्ट केले नाही.
१६ ऑगस्टपासून खासगी विद्यार्थ्यांसाठी परीक्षा
- बाहेरून दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या खासगी विद्यार्थ्यासाठी १६ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरपर्यंत परीक्षा आयोजित केल्या जातील, असेही सीबीएसईने सांगितले.
- नियमित विद्यार्थ्यांसाठीच्या पर्यायी मूल्यांकन धोरणाच्या आधारे खासगी विद्यार्थ्यांचा निकाल घोषित करण्याची शक्यता नाकारताना सीबीएसईने स्पष्ट केले की, शाळा आणि सीबीएसईकडे या विद्यार्थ्यांच्या मागच्या मूल्यांकनाची कोणतीही नोंद नाही.
- उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्यास कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून खासगी विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निकालही लवकरच घोषित केला जाईल, असेही परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी सांगितले.