नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) यंदाच्या बारावी परीक्षेत पहिल्यांदाच सर्वाधिक ९९.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यंदाही मुलींनी बाजी मारत उत्तीर्ण होणाच्या टक्केवारीत मुलांना मागे टाकले आहे.
कोविड-१९ साथीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द करण्यात आल्याने सीबीएसईने वैकल्पिक मूल्यांकन धोरणाच्या आधारावर (३०:३०:४०) सीबीएसईने शुक्रवारी परीक्षेचा निकाल घोषित केला. मागील वर्षाच्या तुलनेत यंंदा उत्तीर्ण होण्याची टक्केवारी १० टक्क्यांनी वाढली. तसेच मागच्या वर्षी मुली आणि मुले उत्तीर्ण होण्याच्या टक्केवारीत ६ टक्के फरक होता. सीबीएसई परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी सांगितले की, मूल्यांकन धोरण यशस्वीपणे आणि निर्धारित मुदतीत लागू करण्यासाठी शिक्षकांचे काम महत्त्वपूर्ण मानण्यात आले होते. त्यासाठी शाळांना सुविधा, निकाल संकलनांत मदत आणि कोणतीही चूक राहू नये, म्हणून सीबीएसईच्या आयटी विभागाने प्रणाली विकसित केली.
केंद्रीय विद्यालये व केंद्रीय तिबेटी शालेय प्रशासनाअंतर्गत येणाऱ्या शाळांचा निकाल यंदा शंभर टक्के लागला. जवाहर नवोदय विद्यालयांचा निकालही ९९.९४ टक्के लागला आहे. सरकारी व अनुदानित शाळांतील विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अनुक्रमे ४.७८ टक्के आणि ७.९२ टक्क्यांनी वाढले. खाजगी शाळांचा निकाल यंदा ११ टक्क्यांनी वाढला .
७० हजार विद्यार्थ्यांना ९५ टक्के गुणमागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा ८० टक्के म्हणजे ७०,००४ विद्यार्थ्यांना ९५ टक्के गुण मिळाले आहेत. १,५०,१५२ विद्यार्थ्यांना ९० ते ९५ टक्क्यांदरम्यान गुण मिळाले आहेत. ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळालेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांची संख्या १२९ आहे. यंदा बारावीच्या परीक्षेसाठी १३ लाख ९६ हजार नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पुरवणी परीक्षा श्रेणीतील ६,१४९ विद्यार्थ्यांची परीक्षा १६ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरदरम्यान आयोजित केली जाईल. पुरवणी परीक्षेच्या निश्चित तारखा नंतर घोषित केल्या जातील, असे भारद्वार यांनी सांगितले.