लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: शिक्षकांच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विशेष लक्ष दिले गेले आहे. त्यानुसार प्रत्येक शाळेतील शिक्षकाचा किमान ५० तासांचा सहभाग हा त्यांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकसनामध्ये असायला हवा असे अधोरेखित आहे. या पार्श्वभूमीवर सीबीएसईकडून दर्जात्मक प्रशिक्षण कसे देता येईल याचा आराखडा तयार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीकडून हे प्रशिक्षण केवळ सीबीएसई शिक्षकांसाठी मर्यादित न राहता सीबीएसईशी संलग्न शाळांमधील शिक्षकांनाही देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे एप्रिलपासून सीबीएसईशी संलग्न असलेल्या शासकीय, शासकीय अनुदानित, सार्वजनिक - खासगी तत्त्वांवरील शाळांमधील शिक्षकांसाठी शिक्षक प्रशिक्षण उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सीबीएसई मंडळाच्या माहितीनुसार नुकतेच लडाख आणि उत्तर प्रदेश येथील १२४ माध्यमिक व उच्च माध्यमिक शासकीय शाळांना सीबीएसईची संलग्नता प्राप्त झाली आहे. शिवाय मध्य प्रदेशातील १००० शाळांचाही समावेश सीबीएसीच्या अखत्यारीत झाला आहे. त्यामुळे या सर्व शासकीय, शासकीय अनुदानित शाळांतील शिक्षकांना त्या त्या राज्यातील शिक्षण विभागाशी समन्वय साधून तेथील शिक्षकांना अत्यावश्यक शिक्षक प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सीबीएसई मंडळावर आली आहे. यासाठी सीबीएसईकडून विविध राज्यांतील शिक्षण विभागासाठी, तेथील शिक्षक प्रशिक्षणाकरिता केंद्रीय पद्धतीचे असे एप्रिल ते मार्च शैक्षणिक वेळापत्रक बनविण्यात येणार आहे.
त्यानुसार शासकीय शाळांतील प्रत्येक शिक्षकाला कमीत कमी त्या शिक्षण विभागाकडून, तेथील शिक्षक संस्थांकडून २५ तासांचे शिक्षक प्रशिक्षण आणि उर्वरित २५ तासांचे शिक्षक प्रशासखान संबंधित शाळांकडून देण्यात येईल अशी तयारी करण्यात येणार असल्याची माहिती सीबीएसईकडून देण्यात आली आहे. तसेच प्रत्येक राज्याच्या शासकीय, शासकीय अनुदानित, आणि पीपीपी तटावरील शाळांतील शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी नोंदणी ही सीबीएसई प्रशिक्षण पोर्टलवर होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
- सीबीएसई नियमानुसार, मंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या शिक्षक प्रशिक्षणात प्रत्येक शिक्षकाचा किमान २५ तास सहभाग असणे आवश्यक आहे. याशिवाय शिक्षण मंत्रालयाकडून राज्यस्तरीय शिक्षक प्रशिक्षणामध्येही शिक्षकांचा सहभाग असल्याचे सीबीएसईकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
- सीबीएसईकडून, सीबीएसई संलग्न शाळांतील शिक्षकांना प्रशिक्षणासाठी देशभरात विविध ठिकाणी १६ सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना करण्यात आली आहे.
- हे प्रशिक्षण दोन प्रकारचे असून त्यातील पहिल्या प्रकारांतर्गतचे प्रशिक्षण सामान्य असते तर दुसरे विषयकेंद्री प्रशिक्षण म्हणून ओळखले जाते. एकीकडे सामान्य प्रशिक्षणात किशोरवयीन शिक्षण प्रशिक्षण, कला प्रशिक्षण, सर्व समावेशक शिक्षण, आनंददायी वर्ग, सायबर सुरक्षा अशा विषयांचा समावेश असतो. तर दुसरीकडे विषयकेंद्री प्रशिक्षणात दहावी, बारावीच्या वर्गांशी संबंधित २३ अभ्यासक्रमांचा समावेश आहे.