मुंबई : १ डिसेंबरपासून शाळेत पहिली ते चौथीचे वर्ग सुरू होणार आहेत. गेले कित्येक महिने घरात बसून कंटाळलेल्या लहान विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेचे वर्ग पहायला मिळणार असल्याने त्यांना आता शाळेत जाण्याची उत्सुकता लागली आहे. कोरोनाचा प्रकोप आता कमी झाला आहे. कोरोनाचा नवा प्रकार जगासमोर आला आहे. येत्या काही महिन्यांमध्ये कोरोनाच्या संभाव्य तिसरा लाटेचा धोका वर्तविला गेला आहे. लहान मुलांचे लसीकरण झाले नसल्याने पालकांची मात्र धाकधूक वाढली आहे.
आता मज्जाच मज्जा
संचित तांबे (विद्यार्थी) - दोन वर्षांपासून शाळेची मज्जा अनुभवली नाही. मित्र नाहीत, खेळ नाही त्यामुळे घरात मन रमत नाही. ऑनलाइन शिकवलेले समजत नाही. मोबाईलमुळे डोळ्यांना त्रास होत आहे. आता शाळा सुरू झाल्यामुळे पुन्हा एकदा सर्व काही सुरळीत होईल.
सक्षम कदम (विद्यार्थी) - ऑनलाईनपेक्षा प्रत्यक्ष शाळा बरी आहे. घरात अभ्यास होत नाही आणि शंका सुटत नाहीत. शाळेतील शिक्षकांमुळे चांगला अभ्यास होतो. शाळा सुरू होत असल्याने मी आता शाळेत जाण्याची आतुरतेने वाट पहात आहे.
आरुषी म्हात्रे - शाळा सुरू होत असल्याने नवीन गणवेश, नवीन पुस्तके, नवीन बॅग घेण्यासाठी लगबग सुरू आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे कंटाळा आला होता. आता प्रत्यक्ष शाळेत जाणार असल्याने शिक्षणाची मजा वाढणार आहे.
आईची काळजी वाढली
उमेश यादव (पालक) - ऑनलाईन शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना खरेच त्या शिक्षणाचा फायदा होत आहे का याची कल्पनाही येत नाही. शाळा सुरू होत असली तरी एक पालक म्हणून अजूनही मनात कोरोनाची भीती आहे.
सारिका घरत (पालक) - शाळेत गेल्यावर शिस्त लागते. शिक्षकांनी दिलेला अभ्यास केला नाही तर शिक्षक मारतील या भीतीने मुले अभ्यास करतात. शिक्षण महत्त्वाचे असले तरी आगामी तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता मनात धाकधूक होते.
लता भागवत (पालक) - कोरोनाचा नवा प्रकार जगासमोर आला आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. शाळा व्यवस्थापनाने मुलांची शाळेत काळजी घेतली पाहिजे.
काय काळजी घेणार?
शाळा सुरू झाल्यानंतर शाळेत सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन केले जाणार आहे. निर्जंतुकीकरण, चेहऱ्यावर मास्क, एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर, थर्मल तपासणी या गोष्टींची काळजी घेतली जाणार आहे.