Maharashtra College Reopening: राज्यातील शाळा सुरू झाल्यानंतर आता महाविद्यालयं देखील सुरू होणार आहे. येत्या २० ऑक्टोबरपासून राज्यातील महाविद्यालयं सुरू होणार असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केली आहे. राज्यातील महाविद्यालयं सुरू होणार असली तरी यासाठी काही नियम घालून देण्यात आले आहेत.
उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यातील महाविद्यालयं २० ऑक्टोबर पासून सुरू होणार असल्याची माहिती दिली. यात विद्यार्थ्यांनी कोरोना विरोधी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणं गरजेचं असणार आहे. तसंच वेगवेगळ्या जिल्ह्यात तेथील कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन वेगवेगळी नियमावली असेल असंही उदय सामंत यांनी सांगितलं आहे. विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष लसीकरण मोहिम राबविण्याबाबतचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.
ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात उपस्थित राहता येणार नाही त्यांना ऑनलाइन शिक्षणाची सोय महाविद्यालयांनी करावी, अशा सूचना उदय सामंत यांनी केली आहे. विद्यापीठ महाविद्यालय वर्ग ५० टक्क्यांपेक्षा अधिक सुरू करण्याचे अधिकार स्थानिक प्राधिकरणाला असणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता महाविद्यालयं सुरू ठेवायची की नाहीत हा सर्वस्वी अधिकार स्थानिक प्राधिकरणाला असणार आहे. विद्यार्थ्यांचं लसीकरण झालेलं नसेल तर महाविद्यालयांनी लसीकरण मोहिम राबवावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच शिक्षकेतर कर्मचारी प्राध्यापक या सर्वांचं लसीकरण पूर्ण झालेलं असणार गरजेचं आहे.