अमरावती : राज्यातील खासगी अभियांत्रिकी, फार्मसी महाविद्यालयांतील प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना ९ ते २७ महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे कोरोनाकाळात कसे जगावे, हा प्रश्न या प्राध्यापक, कर्मचाऱ्यांपुढे उपस्थित झाला आहे. याप्रकरणी महाविद्यालयीन शु्ल्क समितीचे धोरण मारक ठरत असल्याचे वास्तव आहे.गतवर्षी मार्चपासून कोरोना संसर्गामुळे शाळा-महाविद्यालये बंद आहेत. याचा फटका खासगी अभियांत्रिकी, फार्मसी महाविद्यालये, तंत्रनिकेतनमधील प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना बसला आहे. प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना वेतनाविना कुटुंबीयांचा सांभाळ करणे आव्हान ठरत आहे. महाविद्यालयात शुल्क निर्धारण, शिक्षण शुल्क समिती यांच्या निर्देशानुसार विविध शिष्यवृत्तींचा किमान ७० टक्के भाग हा कर्मचारी वेतनावर खर्च करण्याची नियमावली आहे. असे असताना खासगी अभियांत्रिकी, फार्मसी महाविद्यालये तसेच तंत्रनिकेतनमधील प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना तब्बल २७ महिन्यांपासून वेतन मिळत नसेल, तर ही बाब गंभीर आहे. वेतनावर ७० टक्के रक्कम वेतनावर खर्च करण्यात येईल, असे शपथपत्र संस्था संबंधित विभागाला देते. असे असताना ९ ते २७ महिन्यांपासून खासगी अभियांत्रिकी, फार्मसी महाविद्यालये, तंत्रनिकेतनमधील प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना वेतन मिळत नाही, ही बाब दुर्दैवी मानली जात आहे. यासंदर्भात आमदार नागो गाणार यांनी उच्च व तंत्र शिक्षण संचालक, सहसंचालक यांना निवेदन दिले असून, ही गंभीर समस्या सोडवावी, अशी मागणी केली आहे.
अमरावती विभागातील बहुतांश खासगी अभियांत्रिकी, फार्मसी महाविद्यालये, तंत्रनिकेतनमधील प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आले नाही. याविषयी उच्च व तंत्र शिक्षण संचालक, सहसंचालकांना निवेदन देण्यात आले आहे. - प्रदीप खेडकर, अध्यक्ष, शिक्षण मंच