Delhi School Reopen: दिल्लीतील एका इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यानं शाळा पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी थेट सुप्रीम कोर्टाची पायरी चढली आहे. कोरोना प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेता गेल्या अनेक महिन्यांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीनं शिक्षण घ्यावं लागत आहे. दिल्लीचेशिक्षणमंत्री मनिष सिसोदिया यांनीही अद्याप शाळा सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे एका १२ वीच्या विद्यार्थ्यानं थेट सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑनलाइन शिक्षणात येणाऱ्या अडथळ्यांमुळे विद्यार्थी शारिरीक आणि मानसिक त्रासाला सामोरं जात आहेत. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयं आता पुन्हा करण्याचा निर्णय घेतला जावा, अशी मागणी याचिकाकर्त्या विद्यार्थ्यानं केली आहे. देशात अजूनही बहुतांश राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
पालक आणि शिक्षकांनीही ऑनलाइन शिक्षण योग्य पर्याय असल्याचं मत व्यक्त केलं आहे. पण कनेक्टिव्हिटी आणि तंत्रज्ञानाच्या अभावामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. याशिवाय समन्वय राखणं देखील कठीण होत आहे. गेल्या वर्षभरापासून कोणतीही शालेय क्रीडा प्रकार होऊ शकलेला नाही. तसेच सोशल डिस्टन्सिंगचं पालन यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि भावनिक विकासावर परिणाम होत आहे.