लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने जोडण्याच्या निर्णयाची यंदापासून प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी होत आहे. नवीन पुस्तकाच्या रचनेनुसार, इयत्तानिहाय सर्व विषयांचे चार भाग करण्यात आले आहेत; तसेच प्रत्येक पुस्तकामध्ये एक धडा संपल्यानंतर वहीचे एक पान जोडण्यात आले आहे. मात्र त्यानंतरही वह्या लागणार असल्याने दप्तरांचे ओझे कायम राहणार आहे.
पुस्तकात माझी नोंद असे लिहिण्यात आले असून, ‘बालभारती’चा वॉटर मार्कही छापण्यात आला आहे. मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत ही पुस्तके ‘बालभारती’कडून राज्यात उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पाठ्यपुस्तक विक्रेत्यांना आधी जुन्या पुस्तकांचा साठा संपविण्याच्या सूचना असल्याने विद्यार्थ्यांना हवे ते पुस्तक घेण्यात कोणतीही अडचण येणार नाही. नवीन पुस्तकांचे पहिल्या टप्प्यातील छपाईचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके मिळणार आहेत. शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी कमीत कमी वह्या आणाव्यात, यासाठी प्रत्येक धडा संपल्यानंतर वहीचे एक पान जोडण्यात आले असून, या पानावर दोन्ही बाजूंना धड्याशी संबंधित नोंदी करता येऊ शकणार आहेत.
ही पुस्तके अद्याप विनाअनुदानित/ खासगी शाळांसाठी बाजारात उपलब्ध नाहीत. खुल्या बाजारात पुरवठा होणाऱ्या सर्व पाठ्यपुस्तकांचे मंडळाच्या मूल्यांकन सूत्रांनुसार नव्याने मूल्यांकन करून त्यानुसार पुस्तकांच्या किमती निश्चित करण्यात येणार आहेत.
पुस्तकातील नोंद होणाऱ्या पानावरील वॉटर मार्कमुळे विद्यार्थ्यांच्या लिखाणात अडचणी येणार असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. या योजनेमुळे पुस्तकाचा पुनर्वापर हे तत्त्व शिक्षण विभागाकडून गुंडाळून ठेवले जाणार असून, पुनर्वापर न झाल्यामुळे दरवर्षी कित्येक टन पुस्तकांची रद्दी निर्मिती होणार असल्याचे बोलले जात आहे.
वह्या विकत घ्याव्याच लागणार
गृहपाठ किंवा वर्गपाठासाठी स्वतंत्र वह्या करण्याचा पर्याय शिक्षण विभागाने दिला आहे. त्यामुळे वहीचे पान पुस्तकामध्ये जोडले असले, तरी संबंधित विषयांच्या वह्या आणाव्या लागणार असल्याचे राज्य मुख्याध्यापक संघाचे प्रवक्ता महेंद्र गणपुले यांनी स्पष्ट केले. त्यामुळे दप्तरातील वह्यांचे ओझे कमी करण्यासाठी पुस्तकातील पानांचा उपयोग होणार नाही; पण प्रत्येक विषयानुसार पुस्तकाचे चार भाग करण्यात आल्याने पुस्तकांचे ओझे कमी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काही अवघड शब्द, संकल्पना, आकृत्या, काही महत्वाच्या पुस्तकाबाहेरील नोंदी करता येऊ शकतात. त्यामुळे आता या उपक्रमाच्या अंमलबजावणीवर हा प्रयोग किती यशस्वी होईल, हे समजेल. - महेंद्र गणपुले, प्रवक्ता, राज्य मुख्याध्यापक संघ