- अनिल कासारे / लांजा
आर्थिक परिस्थिती बेताची असतानाच वडील आजारी पडले, त्यांच्या उपचारासाठीचा खर्च करण्याची कुटुंबाची ऐपत नव्हती. मग इतरांकडून पैसे जमा करून वडिलांवरील शस्त्रक्रिया केली. पण, तिनं मात्र या प्रसंगातून सर्वसामान्यांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवण्याचा विडा उचलला अन् डॉक्टर बनण्याचा निर्धार केला. पण, डॉक्टर बनणे हेही खर्चिक, त्यामुळे तिनं मदतीचं आवाहन केलं अन् तिच्या मदतीला 'क्रिकेटचा देव' धावून आला. भारतरत्न सचिन तेंडुलकरची संस्था सेवा सहयोग फाऊंडेशन पुढे आली आहे आणि दीप्तीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न आता साकार होणार आहे.
लांजा तालुक्याच्या सिमेवरील राजापूर तालुक्यातील झर्ये हे अतिशय दुर्गम गाव... तिथे जाण्यासाठी नेमक्याच गाड्या, त्यामुळे नागरिकांचा संपर्क कमी प्रमाणात होता. झर्ये येथील दशरथ विश्वासराव हे लांजा तालुक्यातील कोंडगे येथील नावेरी सहकारी पतसंस्थेत क्लार्क म्हणून काम करतात, तर आई गृहिणी आहेत. या दांपत्याला पहिली मुलगी दीप्ती, तर छोटा भाऊ असे चार जणांचे कुटुंब. दीप्तीचे प्राथमिक शिक्षक कोंडगे येथील शाळेत झाले. ती पहिलीपासूनच हुशार होती आणि तिनं शाळेच्या विविध स्पर्धा परिक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. सहावीत ती नवोदय परिक्षेला बसली होती आणि त्यात तिने चांगले गुण प्राप्त केल्याने पुढील शिक्षणासाठी तिला नवोदय शाळा राजापूर येथे जावे लागले.
नवोदय राजापूर येथे शिक्षण सुरू असतानाच वडील आजारी पडले. त्यांच्यावर चार ते पाच शस्त्रक्रिया होणे गरजेचे होते . मात्र यासाठी येणारा खर्च खूप होता. वडिलांची होणारी तगमग तिला पहावत नव्हती, आमच्याकडे पैसे नाहीत म्हणून वडिलांवर वेळेवर उपचार होत नाहीत, हे तिच्या बालमनावर कोरले गेले होते. वडिलांनी इकडून तिकडून पैसे जमा करुन शस्त्रक्रिया केल्या. "आपल्यासारखी अशी कित्येक कुटूंब असतील की ज्यांना पैसे नाहीत म्हणून उपचार करुन घेता येत नाहीत. अशा गोरगरीब लोकांची सेवा करण्यासाठी आपल्याला डॉक्टर होणे गरजेचे आहे," अशा निश्चय दीप्तीने त्यावेळी मनाशी केला. तिनं जिद्द , चिकाटी , मेहनतीच्या जोरावर दहावीच्या परिक्षेत ९४ आणि बारावीमध्ये ९५.३० गुण प्राप्त केले.