लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील तासिका तत्त्वावर कार्यरत प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याबाबत, तसेच २०२१-२२ पासूनचे मानधन प्रलंबित न ठेवता दिवाळीपूर्वीच करा. हे मानधन देण्यासंदर्भात उच्चशिक्षण संचालकांनी दर तीन दिवसांनी आढावा घेण्याबाबत सक्त सूचना उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी दिल्या. त्यामुळे आता राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील तासिका तत्त्वावर कार्यरत असणाऱ्या प्राध्यापकांची दिवाळी गोड होणार आहे.
सरकारच्या दि. २२ ऑक्टोबर २०२१च्या निर्णयानुसार उच्चशिक्षण संचालनालयाच्या अशासकीय अनुदानित महाविद्यालयात तासिका तत्त्वावरील कार्यरत प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. परंतु राज्यातील तासिका तत्त्वारील बहुतांश प्राध्यापकांचे मानधन २०२१ पासून मोठ्या प्रमाणावर प्रलंबित असल्याची बाब सरकारच्या निदर्शनास आली आहे. या अनुषंगाने सर्व संबंधित विभागीय सहसंचालक, उच्चशिक्षण यांनी तपासणी करून २४ ऑक्टोबरपूर्वी त्यांच्या महाविद्यालयातील पात्र तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे मानधन देण्याबाबत प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबत दिरंगाई निदर्शनास आल्यास विभागीय सहसंचालक यांना जबाबदार धरण्यात येईल, असेही पाटील यांनी नमूद केले.
दर तीन दिवसांनी घेणार आढावा संचालक, उच्चशिक्षण यांनी आपल्या स्तरावर दर तीन दिवसांनी आढावा घेत २२ ऑक्टोबरपूर्वी तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे मानधन प्रलंबित राहणार नाही, याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार कार्यवाहीकरून वेळोवेळी सरकारला माहिती देण्यात यावी, असे आदेश सहसचिव द. रा. कहार यांनी दिले आहेत.