मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेत पीसीएम गटातून १३ विद्यार्थ्यांना १०० पर्सेटाइल मिळाले आहेत, तर पीसीबी गटातून १४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल गुण प्राप्त झाले आहेत. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल गुरुवारी सीईटी सेल मार्फत जाहीर करण्यात आला आहे.
१०० पर्सेंटाइलच्या या यादीमध्ये मुंबई व पुण्याच्या विद्यार्थ्यांचा वरचष्मा दिसून आला. हा निकाल विद्यार्थ्यांसाठी सीईटीच्या https://mhitcet2022.mahacet.org/StaticPages/HomePage या अधिकृत संकेतस्थळवर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती सीईटी सेलचे आयुक्त रवींद्र जगताप यांनी दिली.
मुंबई पुण्याचा वरचष्मापीसीएम गटातील १०० पर्सेंटाइलच्या यादीत मुंबईच्या सात विद्यार्थ्यांचा समावेश असून, पुण्याच्या दोन आणि ठाणे, पालघर, सोलापूर, नागपूर, अकोला येथील प्रत्येकी एका विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राखीव प्रवर्गातील विविध संवर्गातून पहिल्या तीन क्रमांकाच्या यादीत आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १२ आहे. पीसीबी गटातून १०० पर्सेंटाइलच्या यादीत मुंबईच्या चार, पुण्याच्या दोन, तर ठाणे, सांगली, सातारा, नागपूर, नांदेड, पालघर, अमरावती, लातूर येथील प्रत्येकी एका विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पीसीबी गटातील राखीव प्रवर्गातील विविध संवर्गातून प्रथम ३ क्रमांकामध्ये आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे.
सीईटीच्या निकालानंतर आता प्रवेश प्रक्रियेसाठी चुरसयंदाच्या निकालात १०० पर्सेंटाइलचेच पीसीबी व पीसीएम गटाचे २७ हून अधिक विद्यार्थी असल्याने ९५ आणि त्याहून अधिकच्या विद्यार्थ्यांची संख्या निश्चितच अधिक असल्याने नामांकित महाविद्यालयांमध्ये काॅम्प्युटर सायन्स, मॅकेनिकल आणि आयटी या शाखांमध्ये प्रवेशासाठी चुरस पाहावयास मिळणार आहे. सीईटीचा निकाल सीईटी सेलकडून जाहीर करण्यात आला असला तरी अद्याप संबंधित शाखांच्या संचलनालयाकडून प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक अंतिम नियमावली तयार आहे की नाही, प्रवेशप्रक्रिया केव्हा व कशी सुरू होणार याची विद्यार्थ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.