- शिवाजी काकडे, सहायक शिक्षक, लालवण निधोना, जि. औरंगाबादमहाराष्ट्र कायदेमंडळाचे सन्माननीय सदस्य प्रशांत बंब यांनी शिक्षक मुख्यालयात उपस्थित राहात नाहीत, याबाबत प्रश्न केला आहे. माझ्या लहानपणी खूप बैल असायचे. आज शेतकरी बैल पाळत नाही म्हणून तो शेतीत काम करत नाही; असा दावा केला तर तो चुकीचा ठरेल ना? कामाचे स्वरूप बदलले, काम कमी झाले नाही. शिक्षकाने शाळेच्या गावात राहावे, याबाबतचा शासन निर्णय झाला तेव्हाच्या दळणवळण सुविधा व आजच्या सुविधा यात फरक आहे. काळाप्रमाणे परिस्थिती बदलणारच! शिक्षकांनी वेळेवर येणे, अध्यापन करणे महत्त्वाचे, की मुख्यालयी राहणे? त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करता येईल. मुख्यालयी राहत नाही म्हणून वेळेवर येत नाही, गुणवत्ताच नाही हे विधान शिक्षकांच्या मानसिकेला धक्का देणारे आहे. अपवाद असतीलच. परंतु सरसकट सर्वांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य होणार नाही. आजही ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहेत. आपला मुलगा कितवीत आहे, हे माहीत नसणाऱ्यांच्या मुलांना आम्ही आई - वडिलांप्रमाणे जपतो, शिकवतो. सर्व विद्यार्थ्यांना गणवेश नाही मिळत तेंव्हा पदरमोड करणारेही अनेक शिक्षक आहेत.ग्रामीण भागातील ८० टक्के गावातील ८० टक्के लोकांनी स्वतःचे गाव सोडून शेत, शेतालगत घरे बांधली. जागेच्या अडचणी, पाण्याच्या अडचणी अनेक कारणे आहेत. मला स्वतःला लालवण गावात खोली मिळाली नाही. काही दिवस मी बाजूच्या गावाला राहिलो. तिथेही तीच अडचण! शेवटी ग्रामपंचायतीच्या खोलीत आम्ही शिक्षक राहिलो. भाड्याने देता येतील, अशी अधिकची घरे बांधण्याइतका ग्रामीण भागात पैसा नाही. मी जन्मापासून आजपर्यंत गावात राहतो. पंढरपुराला पायी गेले तरच विठ्ठल पावतो, अशीही धारणा आहे. परंतु गाडीचा, विमानाचा वापर करून जाणाराही भाविकच ना! शिक्षणाच्या या वारीत कुणी मुख्यालयी राहील, तर कुणी अप-डाऊन करत विठ्ठलाला (विद्यार्थ्याला) गुणवत्तापूर्ण शिक्षण देत राहील, एवढे नक्की!
Education: शिक्षकांनी शिकवणे महत्त्वाचे, की मुख्यालयी राहणे?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 5:37 AM